पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या ताथवडे येथे काल रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत एक जण जखमी झाला आहे. हरिओम सिंग असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
हरिओम हे पाषाणहून आपल्या चारचाकीतून ताथवडेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी अचानक एक गाडी त्यांचा पाठलाग करू लागली. हरिओम ताथवडे येथील एका हॉटेलजवळ कामनिमित्त उतरले. त्यानंतर पुन्हा गाडीत बसताना पाठलाग करणाऱ्या गाडीतून तिघे जण उतरले आणि त्यांच्या गाडीत बसले.
तिघांनी हरिओम यांना धमकावून गाडी पुढे घ्यायला सांगितली. मात्र कशासाठी गाडी पुढे घेऊ, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यावेळी हरिओम यांनी तिघांच्या तावडीतून गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता एकाने त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
या गोळीबारात त्यांच्या पायाला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हरिओम हे ब्रोकर म्हणून काम करतात. पण त्यांच्यावर हा हल्ला का झाला हे अजून अस्पष्ट आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पण त्याच्या साथीदारांनी जेवायला जायचं सांगून सोबत आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे अन्य दोघांना अटक केल्यानंतर गोळीबाराचं कारण समोर येईल.