Sunil Shelke: 'दादांची उणीव जाणवली...', अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक, सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये काय काय घडलं?
Sunil Shelke: पुणे जिल्ह्यातील सर्व अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचबरोबर अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आज पहिल्यांदा बैठक पार पडत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडत आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार उपस्थित आहेत. सुनेत्रा पवार मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरसिंगने बैठकीला उपस्थित राहिल्या होत्या. पुणे विभागीय कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
सुनील शेळके बैठकीनंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अनुपस्थितीत ही पहिली बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुंबईहून ऑनलाईन होत्या. बाकी नेते मंत्री या बैठकीला उपस्थितीत होते. 1 हजार 600 कोटी वाढीव निधी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. अजित दादांची उणीव जाणवली. शहरी आणि ग्रामीणबाबत कसा निधी देण्यात यावा यावर चर्चा झाली. विकासाबाबत अधिक निधी सोलर, आदिवासी यांना निधी देण्यात यावा अशी चर्चा झाली असल्याची माहिती शेळकेंनी दिली.
या घटनेकडे राजकीय किंवा द्वेषाने पाहू नये
तर अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना सुनील शेळके बोलताा म्हणाले, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी एस आय टी स्थापन करण्यात आली होती, तपास यंत्रणा काम करत आहे, जबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोलले पाहिजे, घटना दुदैवी आहे, कुठेही राजकारण झाले नाही पाहिजे. दादा बाय रोड येणार होते, उशीर झाला म्हणून फ्लाईटने आले, या घटनेकडे राजकीय किंवा द्वेषाने पाहू नये, घटनेचा तपास सुरू आहे, येणाऱ्या तपासाच्या माहितीची वाट पाहू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर शेळके म्हणाले...
तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना सुनील शेळके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत दादांनी जर कुठल्या चर्चा केल्या, त्यात शंका आणायचं कारण नाही किंवा आम्ही नाकारत नाही, आत्ताच्या काही चर्चा सुरू आहेत, त्याची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यायच्यात विलीनीकरणाबाबत सगळा निर्णय सुनेत्रा पवार घेतील, महायुती सरकारमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे पक्ष सोबत आहेत, या प्रमुख पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय होईल, आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यात वावगं काय आहे, मात्र याबाबत निर्णय सुनेत्रा पवार घेतील, अशी माहिती देखील सुनील शेळके यांनी दिली आहे.
























