पेटलं तिकडं, अडीच एकराला कोटी काय, रुपया नको, 35 जनावरं ती कुठं नेऊ? मोबदला मातीत घालायचा का? शासन आम्हाला येड्यात काढायचा प्रयत्न करतंय; पूरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
Purandar Airport: जर सरकारने बळजबरी केली, तर आम्ही पुन्हा 100 टक्के रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू. आमचा विरोध कायमस्वरूपी आहे, जीव गेला तरी चालेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Farmers Oppose Purandar Airport: प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) जमीन अधिग्रहणासाठी सरकारने दर जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आक्रोश पसरला आहे. या प्रकल्पासाठी एकरामागे 1 कोटी 61 लाख 1 हजार 925 रुपये देण्यात येणार असल्याची घोषण पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. मात्र, एकराला अडीच कोटी काय रुपया सुद्धा नको म्हणत शेतकऱ्यांनी आक्रोश केला आहे. संभाव्य जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. जर सरकारने बळजबरी केली, तर आम्ही पुन्हा 100 टक्के रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू. आमचा विरोध कायमस्वरूपी आहे, जीव गेला तरी चालेल, असा इशारा दिला.
अडीच एकराला एक कोटी काय, रुपया नको
एक गावकरी शेतकरी महिला म्हणाली की, आम्हाला द्यायचीच नाही जमीन. अडीच एकराला एक कोटी काय, आम्हाला रुपया नको आणि तुमची जमीनही नको. आमच्या जमिनी आहेत तशाच आम्हाला पाहिजेत. शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले की, विकासाची गरज नाही आम्हाला, आम्ही यात सुखी आहे. या विमानतळामुळे शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, तर अख्खा शेतकरी 'भुईसपाट' होणार आहे.
आमची जनावरं घेऊन आम्ही जाणार कुठं?
एका शेतकऱ्याने सांगितले की, आमची जनावरं घेऊन आम्ही जाणार कुठं? माझ्याकडे 35 जनावरं आहेत, ती कुठं नेऊ? मोबदल्याला काय मातीत घालायचं का? शासनाच्या भूमिकेवर काही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, "शासन आम्हाला येड्यात काढायचा प्रयत्न करतंय, पण आम्ही येडं होणार नाही. गेल्या 10 वर्षांपासून लोक ओरडतायत तरी सरकारला अक्कल नाही का?" अशी विचारणा केली.
पण सरकारला एवढी घाई का लागली आहे?
सरकार म्हणतंय सक्तीने घेऊ, पण कितीही सक्ती केली तरी आम्ही जमिनी देणार नाही. जर त्यांना शेतकरी मारायचाच असेल, तर मग त्यांना काय करायचं ते करू दे, असे आव्हान त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, आम्ही कोर्टात गेलो आहोत. सरकार खोटी आकडेवारी सांगून (उदा. 96 टक्के संमती) लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. कोर्टात जो निर्णय लागेल तो आम्हाला मान्य असेल, पण सरकारला एवढी घाई का लागली आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार
दरम्यान, या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या जमिनीपैकी 10 टक्के जमीन विकसित भूखंड शेतकऱ्याला परत केला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. (Purandar Airport Land Acquisition) पुरंदर विमानतळाच्या या प्रकल्पासाठी पुरंदरमधील 7 गावांमध्ये मिळून 1 हजार 216 हेक्टर जमीन तर इतर 242 एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे.
या गावांमधील शेतकऱ्यांना व्याजासहित एक एकरला 1 कोटी 51 लाख 1 हजार 925 रुपये एवढा दर देण्यात येणार आहे. 10 जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. ज्याची सहमती असेल त्यांना पैसे दिले जातील, जे सहमती देणार नाहीत त्याची सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु जमीन अधिग्रहणास स्थानिकांचा विरोध कायम आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















