पुणे: प्रसिद्ध कीर्तनकार आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या चैतन्य वाडेकर (महाराज) (Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar) यांना काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या कारवईनंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या, त्यानंतर आता घटलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत चैतन्य वाडेकर (महाराज) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रसार माध्यमांवर अनेक वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीच्या बातम्या माझ्या नावाने प्रसारित झाल्या आहेत असं स्पष्टीकरण आता चैतन्य महाराज वाडेकर यांनी दिलंय. 


काय म्हणालेत चैतन्य वाडेकर (महाराज)?


काल विविध माध्यमांवर अनेक चुकीच्या प्रकारच्या बातम्या माझ्या नावाने प्रसिध्द झाल्याचं दिसून आलं. एक संत साहित्यिक अभ्यासक या नात्याने माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी राज्यातील तरूणांनी फोन, मेसेज, गाठीभेटी घेऊन काळजी व्यक्त केली. माझ्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये दबावतंत्र वापरून भांडवलदार बिल्डरने जागा हडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोणतीही खातरजमा न करता एक चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. माझी बदनामी करण्याच्या हेतून आणि उद्देशाने खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला, त्या निराशाजनक होत्या. हरकत नाही. मात्र, या घटनेची सविस्तर माहिती आणि कागदोपत्री पुरावे देण्यासाठी मी पत्रकार परिषद घेणार आहे, अशी माहिती चैतन्य वाडेकर यांनी दिली आहे.




नेमकं काय आहे प्रकरण?


चैतन्य वाडेकरांनी (Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar) तीन भाऊ आणि इतर साथीदारांच्या मदतीने खाजगी रस्त्यासह कंपाऊंड उखडला. चाकण एमआयडीसी हद्दीत चैतन्य वाडेकर वास्तव्यास आहेत. तिथल्याचं एका बिल्डरसोबत वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरु आहेत. या बिल्डरने त्यांच्या घरा लगतची जागा विकसित केली असून, तिथं कंपनी उभारण्यात आली आहे. मात्र या बिल्डरने माझी जागा हडपली असून माझ्या जागेतून खाजगी रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबीयांनी केला. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी, अशी मागणी वाडेकरांकडून नेहमी करण्यात येत होती. मात्र, ही मागणी मान्यचं होत नव्हती. यावरून न्यायालयीन लढा सुरु असतानाच वाडेकरांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली. 


मात्र, यातून ही जागा वाडेकरांच्या (Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar) मालकीची आहे. हे सिद्ध होण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं, अपेक्षित होतं. न्यायालयाने मोजणीची मागणी पूर्ण करताचं चैतन्य वाडेकर हरकून गेले. त्यांनी त्यांच्या तीन भावांसह इतर साथीदारांना एकत्र केलं, जेसीबी ही मागवला आणि रात्रीतचं कंपनीकडे जाणारा खाजगी रस्ता उखडून टाकला, कंपाऊंड ही तोडून टाकला. मग प्रकरण महाळूंगे पोलीस स्टेशनमध्ये गेलं.