पुणे: पुण्यासह राज्यात प्रसिद्ध असलेले कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रीय असलेले चैतन्य महाराज यांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हभप चैतन्य महाराज यांच्यासह त्यांच्या दोन भावांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून उपदेशाचे डोस पाजणारे चैतन्य महाराज वाडेकर चांगलेच प्रसिध्द आहेत. मात्र सोशल मीडियावर संत बनू पाहणाऱ्या या चैतन्य महाराजांचा एक प्रताप समोर आला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. (Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar)


नेमकं काय आहे प्रकरण?


चैतन्य महाराजांनी त्यांच्या दोन भावांसह आणि नातेवाईकांसह त्यांच्या घराच्या जवळून जाणारा रस्ता पोकलेनने बेकायदेशीरपणे खोदल्याचं समोर आलं आहे, त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी चैतन्य सयाजी वाडेकर (महाराज)(Famous Kirtankar Chaitanya Maharaj Wadekar), अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली आहे. काल (बुधवारी) मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. 


चाकण एमआयडीसी हद्दीत चैतन्य महाराज वास्तव्यास आहेत. तिथल्याचं एका बिल्डरसोबत वाडेकर कुटुंबियांचे जमिनीवरून वाद सुरु आहेत. या बिल्डरने त्यांच्या घरा जवळ असलेली जागा विकसित केली असून, तिथं कंपनी उभारली आहे. मात्र या बिल्डरने माझी जागा हडपली असून माझ्या जागेतून खाजगी रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबीयांनी केला. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी, अशी मागणी वाडेकरांकडून नेहमी करण्यात येत होती. मात्र, ही मागणी मान्य होत नव्हती. यावरून न्यायालयीन लढा सुरु असतानाच वाडेकरांच्या बाजूने निकाल लागला आणि सरकारी मोजणीला मान्यता मिळाली. 


मात्र, यातून ही जागा वाडेकरांच्या मालकीची आहे. हे सिद्ध होण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणं, अपेक्षित होतं. न्यायालयाने मोजणीची मागणी पूर्ण करताचं चैतन्य वाडेकर हरकून गेले. त्यांनी त्यांच्या तीन भावांसह इतर साथीदारांना एकत्र केलं, जेसीबी ही मागवला आणि रात्रीतचं कंपनीकडे जाणारा खाजगी रस्ता उखडून टाकला, कंपाऊंड ही तोडून टाकलं. कंपनीच्या कंपाउंडचे पत्रे देखील काढले. 


अखेर या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अजित पाटील यांनी म्हाळुंगे पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर, प्रमोद सयाजी वाडेकर आणि ऋषिकेश शशिकांत सूर्यवंशी यांना अटक केली. चैतन्य महाराज वाडेकर हे नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. ते रिल्स देखील बनवतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यांच्या या अटकेमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.


आजवर समाजाला उपदेशाचे डोस देणाऱ्या महाराजांचे रिल्स पाहिलेल्या पोलिसांना देखील हा धक्कादायक प्रकार पाहून धक्का बसला. आता चैतन्य महाराजांना महाराज म्हणावं तरी कसं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बरं, आता आपण कायदा हातात घेतला तर चूक मान्य करावी? पण सोशल मीडियावर महाराज बनून संत बनू पाहणारे चैतन्य वाडेकर शांत बसले तर नवलंचं म्हणावं लागेल? अपेक्षेप्रमाणे त्यांनी पोलिसांना आपण किती फेमस आहोत आणि किती शहाणे आहोत, याचे उपदेशाचे डोस द्यायला सुरुवात केली. 


सुरुवातीला पोलिसांनी सबुरीने घेतलं, मात्र पोलिसांची सहनशीलता अखेर संपली. मग स्वतःला महाराज समजणाऱ्या चैतन्य वाडेकरांना पोलिसांनी कायद्याचे डोस पाजले. तेव्हा हवेत असणारे चैतन्य वाडेकर जमिनीवर आले. मग हळूहळू करत आपल्या चुका मान्य करू लागले. सोशल मीडियावर हवा करणाऱ्या चैतन्य वाडेकरांना अखेर तुरुंगाची हवा खावी लागली. पोलिसांनी त्यांच्यासह तीन भाऊ आणि इतर दोन अशा सहा जणांना बेड्या ठोकल्या. जेसीबी ही जप्त केले आहे.


आणखी वाचा - मोठी बातमी : चैतन्य महाराजांना बेड्या, सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणारे महाराज पिंपरी पोलिसांच्या कचाट्यात!