Eknath Shinde on Ravindra Dhangekar: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्या वादावर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. “महायुतीमध्ये दंगा करायचा नाही आणि विरोधकांच्या हातात काही कोलीत मिळेल असं करू नका,” असे शिंदे म्हणाले. शिंदे यांनी रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता असल्याचे सांगत पाठ सुद्धा थोपटली. ते आळंदीत पत्रकारांशी बोलत होते. विशेष म्हणजे या वेळी रवींद्र धंगेकर हेही शिंदे यांच्या सोबत उपस्थित होते. यावेळी हेलिपॅडवर शिंदे यांनी धंगेकर यांच्याशी संवाद साधला.
दिल्ली वारीच्या चर्चेवर शिंदे यांनी मौन पाळले
रविंद्र धंगेकरांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “मी त्यांना सांगितलं आहे, महायुतीमध्ये दंगा करायचा नाही.” या वक्तव्याने मोहोळ-धंगेकर वादाचा शेवट होणार का? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, मात्र दिल्ली वारीच्या चर्चेवर शिंदे यांनी मौन पाळले. शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ येते तेव्हा तेव्हा शिंदे दिल्लीत जाऊन मोदी शाहांना भेटतात, त्यांचे मालक दिल्लीत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला होता.
उदय सामंतांची प्रतिक्रिया, “दोन्ही बाजूंनी संयम हवा”
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही मोहोळ-धंगेकर वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मुरलीधर मोहोळ यांना गैरसमज झाला आहे. मी दोन्ही पक्षांबद्दल बोललो होतो. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं दोन्ही बाजूंच्या लोकांनी बोलू नये, वागू नये.” सामंत पुढे म्हणाले, “रवींद्र धंगेकर बोलत असताना ते उचित आहेत, असं मी कधीच म्हटलं नाही. आम्ही महायुतीत आहोत, त्यामुळे प्रत्येकाने संयम ठेवायला हवा. नवी मुंबईत जे चालू आहे, तेही थांबलं पाहिजे.” सामंत यांनीही धंगेकरांना थेट भेटून काही सूचना दिल्याचंही समजते.विशेष म्हणजे पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर असा सामना रंगला असतानाच नवी मुंबईसह ठाण्यात शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा वाद पेटला आहे. गणेश नाईक यांनी अत्यंत शेलक्या शब्दात शिंदे पित्रा पुत्रावर सातत्याने तोफ डागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या