Ebola Virus पुणे: इबोला आजाराच्या (Ebola Virus) पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर (Pune Airport) परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आता तपासणी केली जाणार आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांची इबोला चाचणी केली जाणार आहे. दुबई आणि बँकॉकमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे.
इबोला कोरोनापेक्षाही भयानक असल्याचं सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इबोला साथीला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. आत्तापर्यंत विमानतळावर केलेल्या तपासणीत इबोलाचा रुग्ण आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. (Ebola Virus In India)
भारतात विमानतळांवर हाय अलर्ट जारी- (Ebola Virus In India)
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष दक्षता घेण्यात येत असून, प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग (Thermal Screening) व तपासणी केली जात आहे. केंद्र सरकारने नागरिकांना काँगो , युगांडा (Uganda) आणि दक्षिण सुदान (South Sudan) या देशांमध्ये विनाकारण प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. भारतात सध्यातरी एकही रुग्ण आढळलेला नाही, तरीही विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इबोलाची मुख्य लक्षणे कोणती? (What are the main symptoms of Ebola?)
- अचानक तीव्र ताप
- प्रचंड अशक्तपणा
- तीव्र डोकेदुखी
- स्नायू दुखणे
- उलट्या, जुलाब
- डोळे लाल होणे
- भूक न लागणे
इबोला कोरोनापेक्षाही डेंजर- (Ebola Virus)
इबोला हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार बाधित व्यक्तींचे शारीरिक द्रव, दूषित वस्तू आणि या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांच्या थेट संपर्कातून पसरतो. ताप, अंगदुखी, उलट्या आणि जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. गुरुवारी, डीआरसीच्या (DRC) आरोग्य मंत्रालयाने आपल्या आकडेवारीमध्ये नमूद केले की, या आजाराच्या उद्रेकामुळे 670 संशयित रुग्णांपैकी 160 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे.
केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी- (Ebola Virus)
मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जो कोणी व्यक्ती इबोलाबाधित रुग्णाच्या रक्ताच्या किंवा शरीरातील द्रवांच्या (body fluids) संपर्कात आला असेल, त्याला निरीक्षणाखाली ठेवले जाईल. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की, भारतात दाखल झाल्यापासून 21 दिवसांच्या आत जर कोणत्याही व्यक्तीमध्ये इबोलाची लक्षणे दिसून आली, तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या प्रवासाचा इतिहास उघड करावा. विमानतळ आरोग्य संस्था या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवून आहे. इबोला हा अत्यंत धोकादायक आजार असल्यामुळे, केंद्र सरकारने प्रवाशांना आवाहन केले आहे की, आरोग्य तपासणीच्या प्रक्रियेदरम्यान त्यांनी पूर्ण सहकार्य द्यावे.
