Diveagar beach Tragedy Raigad: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आळंदीवरुन सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. पुण्यातील आळंदी (Alandi news) येथील विनर्स अकॅडमीमधील अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि शिक्षक असे मिळून 48 जण दिवेआगर (Diveagar) याठिकाणी सहलीसाठी आले होते. गुरुवारी दुपारी हे सर्व विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात खेळत असताना ही दुर्घटना घडली. या विद्यार्थ्यांपैकी सर्व मुली या किनाऱ्यावरच खेळत होत्या, कोणीही पाण्यात उतरले नव्हते. तर सर्व मुलं शिक्षकांसोबत पाण्यात होती. यावेळी समुद्राला भरती होती.  समुद्राच्या पाण्यात खेळत असताना  एकाला वाचवण्याच्या नादात सात विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात खेचले गेले. त्यावेळी त्यांचे शिक्षक नेमके समुद्रातून बाहेर गेल्याने त्यांना विद्यार्थ्यांच्या मदतीला जाता आले नाही. त्यामुळे आठ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. (Diveagar beach 8 students drown in sea)

Continues below advertisement

या दुर्घटनेनंतर दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर भयावह दृश्य पाहायला मिळाले. स्थानिकांनी आणि पोलिसांना याबाबत समजल्यानंतर तातडीने सर्वजण मदतीसाठी आले. या सर्वांनी सात विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढले. सात विद्यार्थ्यांचे मृतदेह दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांच्या बाजूलाच ठेवण्यात आले होते. यावेळी पोलीस या मुलांचा जीव वाचवण्यासाठी सीपीआर ट्रिटमेंट देत होते. एकाला सीपीआर ट्रिटमेंट दिल्यावर त्याने प्रतिसाद दिला नाही, तर दुसऱ्याकडे जाऊन पोलीस सीपीआर ट्रिटमेंट देत होते. पण सर्व विद्यार्थी निश्चलपणे पडून होते. हे दृश्य अंगावर काटा आणणारे होत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Diveagar beach 8 Students died: आळंदीचे विद्यार्थी समुद्रात का बुडाले?

गुरुवारी दुपारी रायगडच्या दिवेआगार समुद्र किनारी आळंदी येथून फिरण्यासाठी आलेल्या क्लासच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता.रात्री उशिरा या तरुणांचे मृतदेह शवविच्छेन आणि कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  दिवेआगार समुद्र किनारी पर्यटकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. महाकाली वॉटर स्पोर्टच्या भाऊ साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते पोहोचेपर्यंत आठ विद्यार्थी समुद्रात बुडाले होते. 

Continues below advertisement

भाऊ साळुंखे यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, काल दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर मुलांची सहल आली होती. काल तीन वाजता मुलं पाण्यात उतरली होती.  मी  साडेतीन वाजता त्यांना, इथे थांबू नका, वॉटर स्पॉर्टस लांब आहे, माझ्याजवळ थांबा. माझे वॉटर स्पोर्टस असलेला पॉईंट इथून दीड किलोमीटर लांब आहे. मी त्यांना म्हणालो की, माझ्याइकडे वॉटर राईड करु नका, पण त्या पॉईंटजवळ थांबा. मी त्यांना हे सांगून माझ्या पॉईंटजवळ आलो. त्यानंतर 20 मिनिटांनी त्या विद्यार्थ्यांपैकी एकजण आला. तो म्हणाला की, आमच्यापैकी एकजण बुडाला आहे. मी लगेच माझी टीम घेऊन तिकडे गेलो. आमच्या टीमने समुद्रात जाऊन पटापट सात मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर आठव्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडायला दीड तास लागला. दोन तास इतके प्रयत्न करुनही आम्हाला एकाही विद्यार्थ्याला वाचवता आले नाही, याचे दु:ख वाटते.  ती मुलं समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर आतमध्ये होती. आम्ही मुलांना वाचवायला भरपूर प्रयत्न केले. पण पावसामुळे समुद्राला खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा मुलांना अंदाज आला नाही आणि एकाला वाचवण्याच्या नादात सगळेजण आत खोल समुद्रात खेचले गेले, असे भाऊ साळुंखे  यांनी सांगितले. 

आणखी वाचा

Raigad Diveagar beach Tragedy: आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली