पुणे : मला काहीही झालेलं नाही, मी भक्कम आहे. फक्त अजितदादा गेल्यानं, मला भावना आवरत नाहीत असं सांगताना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) भावुक झाल्याचं दिसून आलं. सध्या सुरु असलेल्या राजकीय चर्चेत जायचं नाही अन् त्या चर्चांमध्ये पडायचंही नाही असं स्पष्ट करताना दिलीप वळसे पाटलांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर सुरु असलेल्या राजकारणावर काही बोलणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात वळसे पाटलांची तब्येत नाजुक असल्याने ते डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबईत होते. त्यामुळे मतदारसंघात वळसे पाटील फारच आजारी असल्याची चर्चा होती. त्यावर वळसे पाटलांनी स्पष्टीकरण दिलं.
मंचर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या आभार मेळाव्यात दिलीप वळसे पाटील बोलत होते. मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यानं मला भावना आवरत नाहीत, असं म्हणताना वळसे पाटील खूपचं भावुक झाले.
Dilip Walse Patil On NCP Alliance : विलिनीकरणावर बोलणार नाही
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू झाल्या. शरद पवार गटाकडून अजितदादांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला. तर अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. या प्रकरणावर आता दिलीप वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. सध्या सुरू असलेल्या राजकारणात, राजकीय चर्चांमध्ये पडायचं नाही असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
अजितदादांच्या जाण्यानंतर आता आपली जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे कुणीही कुठल्याही पदासाठी हट्ट करू नका, लॉबिंग करून नका असं आवाहन दिलीप वळसे पाटलांनी केलं. जो निर्णय पक्ष घेईल त्या निर्णयासोबत आपल्याला जायचं आहे असंही ते म्हणाले.
शरद पवार गटाकडून चर्चांना पूर्णविराम
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार गट आणि राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणावरुन जोरदार दावे-प्रतिदावे सुरु आहेत. मात्र आता विलिनीकरणाच्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम लागणार आहे. विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवार गटातून सध्या तरी कोणी बोलणार नसल्याची भूमिका नेते शशिकांत शिंदेंनी घेतली आहे.
अजित पवारांच्या नेत्यांकडून जोपर्यंत कोणी चर्चा करत नाही तोपर्यंत विलिनीकरणावर मौन बागळण्याचा पवित्रा शरद पवार गटानं घेतला आहे. विलिनीकरणानंतर अजित पवारांकडेच नेतृत्व राहणार होतं असा दावाही नुकताच शिंदेंनी लेखात केला होता. त्यामुळे विलिनीकरणाचं नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जयंत पाटील यांनीही भाष्य करणं टाळलं आहे. विलिनीकरणावर मला भाष्य करावंसं वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. शरद पवारांच्या नेतृत्वात आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. आमचा पक्ष त्या दृष्टीने वाटचाल करेल, असं जयंत पाटील म्हणाले. आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ, असं सुनेत्रा पवारांना सांगितलंय. सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसमोर अडथळे किंवा प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही, असं महत्त्वाचं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलं.
ही बातमी वाचा :
