Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) माझा सवालच नाहीये. माझा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार साहेब (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांना आहे की, या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा, तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं समर्थन आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या मेळाव्यातून ते बोलत होते. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्यामध्ये एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे. ही अशी स्थिती आहे जी आपण राज्यात कधीच बघितली नव्हती. आज अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की, हे समाज एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो. म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायेत.  


गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भाजपची भूमिका


खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, निवडणुका येतील आणी जातील एखादे सरकार बनेल, राहणार नाही, सरकार येतात आणि जातात. पण, समाज एकसंघ राहिला पाहिजे. एखाद्या निवडणुकीत तुमची पोळी भाजली जाईल, पण एकदा समाजामध्ये दुफळी राहिली तर किमान तीन पिढ्यातील दुफळी तुम्हाला दूर करता येत नाही. कुठे आम्ही समाजाला आमच्या नेतो आहोत? काय नेमका आम्ही करतोय? याचा देखील विचार झाला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे. मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे. 


मराठा आरक्षणाचा पहिला बळी स्वर्गीय अन्नासाहेब पाटील


माझा सवाल आहे की, आरक्षणाची लढाई सुरू कधी झाली? 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं की, तुम्ही आरक्षण दिलं नाही तर माझा जीव मी संपवेल. त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही देत आणि स्वर्गीय अन्नासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली. मराठा आरक्षणाचा पहिला बळी जर कोणी होते तर ते स्वर्गीय अन्नासाहेब पाटील होते, असे त्यांनी म्हटले. 


पवार साहेबांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? 


1982 सालापासून 2014 साली आपलं सरकार येईपर्यंत इतके सरकार आली, त्यातली जास्तीत जास्त सरकार काँग्रेसची होती. शरद पवार साहेबांचे सरकार होते. पवार साहेब चार वेळा स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही? माझा सवाल आहे की, अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साले स्वतःला गोळी मारून घेतली होती. तुम्ही चार वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं की, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. हे मी नाही बोललो कोण बोलले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे.


आम्ही पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं


होय आम्ही आरक्षण दिले, आमचे सरकार होतं तोपर्यंत सुप्रीम कोर्टात तीन वेळा केस लागली. सुप्रीम कोर्टाने नकार दिला जोपर्यंत आम्ही होतो. सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीत ठाकरेजी आणि शरद पवार यांचं सरकार आलं आणि मराठा आरक्षण गेले. त्याला प्रोटेक्ट करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही. पुन्हा एकनाथराव शिंदे यांचा सरकार आलं. आम्ही पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं.  आज भरती चाललेली आहे. पोलीस भरतीमध्ये हजारो तरुण आता मराठा समाजाचे भरती झाले आहेत. हजारो तरुणांची वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरती झालेली आहे. 


मराठा आरक्षणाचं राजकारण चाललंय


हे सगळं होत असताना देखील मराठा आरक्षणाचे राजकारण चाललंय. अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांचे मी अभिनंदन करेन. आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. त्याला निधी दिला. या महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं. आज सारखीच्या माध्यमातून ज्यावेळी तरुण पुढे येतात आणि म्हणतात सारथी होतं म्हणून आम्ही आयएस झालो, मला आनंद होतो आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. कारण आपल्या सरकारने सारथी सुरू केलं. पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुरू केलेला नाहीये. 


मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला शरद पवार-उद्धव ठाकरे तयार आहेत का?


जे काही आंदोलन चाललंय मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाहीये. माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे की, तुम्ही एकदा हे जे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा, तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा. ही दुटप्पी भूमिका सोडा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.