पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काही दिवसांपुर्वी बालेकिल्ल्यामध्ये मोठं खिंडार पडलं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरद पवारांच्या उपस्थितीत (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आमदार विलास लांडेंचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंचा देखील समावेश होता. बालेकिल्ल्यातील या डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशानंतर दुसऱ्या दिवशी सर्व आजी-माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आज ते पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा घेत आहेत. या मेळाव्यात बोलताना त्यांनी अजित गव्हाणेंवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. 


अजित गव्हाणेनी स्वार्थासाठी तुतारी फुंकली. काही जण स्वार्थासाठी हिकडं तिकडं गेले, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आता ही विधानसभा भाजपला सुटणार, मग मी कसा आमदार होणार? असं म्हणणाऱ्यांचा विचार करू नका. अजित गव्हाणेनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि तो गेला. आता त्याच त्याला लखलाभ, पण आपल्या पक्षात असणारे आणि तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांना समजून सांगा. इकडे तर इकडे राहा नाहीतर एकदाच जा असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत. 


अजित गव्हाणेंनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?



अजित गव्हाणे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, पिंपरी चिंडवडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे काम झालं होतं. गेल्या २०१७ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आली. तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहराची मोठ्या प्रमाणावर अधोगती झाल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे भोसरी विधानसभा हा भाग सर्वांत जास्त मागे पडलेला आहे. सत्ता असताना देखील काही विकासकामे झालेली नाहीत. एकहाती सत्ता अजित पवारांकडे (Ajit Pawar) नव्हती. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती दिसून येत आहे, त्यामुळे आम्ही अजित दादांना सोडून शरद पवारांसोत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितलं आहे. 


बालेकिल्ल्यात धक्का बसल्यानंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये



पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसल्यावर अजित पवार (Ajit Pawar) खडबडून जागे झाल्याचं चित्र आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी घड्याळ सोडून शरद पवारांची तुतारी फुंकल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) तातडीने उर्वरित पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवार बालेकिल्ल्यात विशेष लक्ष देत आहेत. आज ते पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा घेत आहेत.