दौंड, पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) येणार एकाच मंचावर येणार आहे. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कुलच्या नूतन वस्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघे एकाच मंचावर दिसणार आहे. 22 ऑक्टोबरला हा कार्यक्रम असणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर दुसऱ्यांदाच काका पुतण्या एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात एकमेकांबाबात काय बोलणार किंवा कौटुंबिक एकी दाखवणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
येत्या रविवारी अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. नुकताच विद्या प्रतिष्ठानचा 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित असणार आहे. सोबत या संस्थेचं विश्वस्त मंडळही उपस्थित असणार आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दुसऱ्यांदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावेळी अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आले होते. मात्र दोघांनी नजरानजर केली नव्हती. अजित पवार शरद पवारांच्या मागून निघून गेल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर साखर संकुलाच्या बैठकीच्या वेळी दोघे एकमेकांसमोर य़ेणार असल्याची शक्यता होती मात्र त्यावेळी अजित पवारांनी या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे आता दोघेही थेट विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यक्रमात एकाच मंचावर दिसणार आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी अनंतराव पवार या शाळेचं उद्घाटन होणार आहे दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोचरा वार केला होता. त्यापूर्वीही अनेकदा दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता हे दोघेही एकाच मंचावर भाषण करणार आहेत. यावेळी काय बोलणार?, एकमेकांवर टीका टिपण्णी करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.