पुणे : पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सध्या अपुरा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार समोर येत आहे. अनेक भागांत प्रतिव्यक्ती दहा लिटरही पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्यात सांडपाण्याची मिसळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाब आणि अतिसाराचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी अशुद्ध व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यावरून महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाला चांगलेच जाब विचारला. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत महापौर मंजुषा नागपुरे यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे निर्देश दिले.(Pune Municipal Corporation)

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरवात झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नगरसेविका प्रिया गदादे यांनी जनता वसाहतमधील ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याबाबत मुद्दा उपस्थित केला. कोंढवा, महंमदवाडीसह समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा अपुरा होत आहे. किमान अर्धा ते एक तास पाणी मिळणे अपेक्षित आहे; परंतु प्रतिव्यक्ती १० लिटर देखील पाणी मिळत नाही. त्यामुळे टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. काँग्रेसचे प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे हाजी गफूर पठाण, वैशाली बनकर, सूरज लोखंडे, अश्विनी लांडगे, भाजपचे हरिदास चरवड, प्राची आल्हाट, दिलीप वेडे पाटील, अॅड. प्रसन्न जगताप यांचा समावेश होता.(Pune Municipal Corporation)

६० ते ७० ठिकाणी ड्रेनेज व पाण्याची लाइन एकत्रच

कोंढवा भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती मंगळवारी पूर्ण करण्यात आली आहे. उपनगरातील विविध भागांत आतापर्यंत १४ पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र काही ठिकाणी रस्ते खोदकामास परवानगी किंवा तांत्रिक अडचणी असल्याने जलवाहिनी टाकण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या लाइन एकत्र आल्यामुळे पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यानुसार अशा सुमारे ६० ते ७० ठिकाणांची ओळख पटवण्यात आली असून त्या ठिकाणी स्वतंत्र लाइन टाकण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता राज्य सरकारकडे पाणीपुरवठ्याचा वाढीव कोटा मंजूर करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

शहराच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढवा : खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पुणे महानगरपालिकेत भेट दिली, पुणे शहराच्या पाण्यावरून आणि पाणी बिलाच्या थकबाकीवरून महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये सुरू झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून तोडगा काढवा, असे मत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. शासनाच्या दोन विभागांमध्ये अशा प्रकारे वाद निर्माण होणे योग्य नाही, त्यामुळे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या भागातील विविध नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खा. सुळे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, महापालिकेतील गटनेते काका चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पाण्यावरून निर्माण झालेल्या महापालिका व जलसंपदा विभागातील वादावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली.

सुळे म्हणाल्या, बारामती मतदारसंघात येणाऱ्या शहरातील विविध भागांमध्ये पाणी, कचरा, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सातत्याने वाढत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी दर दोन महिन्यांनी मी महापालिकेकडे पाठपुरावा करते. त्यानुसार आजही महापालिका अधिकाऱ्यांशी हे प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा केली.