काँग्रेसचा पुण्यासाठी 21 कलमी वचननामा प्रसिद्ध
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 07:23 PM (IST)
पुणे : काँग्रेसने 24 तास पाणी देण्याची घोषणा करत पुण्यासाठी 21 कलमी वचननामा प्रसिद्ध केला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. पुणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यास महापालिका स्वखर्चाने 24 तास पाणी पुरवठा करेल. पाणी पुरवठा करणाऱ्या लाईनचे 100 टक्के जाळं पूर्ण करण्यात येईल, असं वचननाम्यात म्हटलं आहे. कचरा व्यवस्थापन, मलनिःसारण, वाहतूक व्यवस्था, रस्ते विकास, पार्किंग व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, झोपडपट्टी विकास, निर्मळ मुळा-मुठा, सांस्कृतिक पुणे, सुरक्षित पुणे, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन विकास, क्रीडा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, आठवडे बाजार, मजूर अड्डा, पर्यावरण संवर्धन, उत्पन्न वाढ, मोफत वाय-फाय झोन अशा शहराशी निगडीत सर्वच प्रश्नांचा या 21 कलमांत समावेश करण्यात आला आहे.