Pune Ashadhi Wari Toll Free : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस येथील टोल प्लाझा कंपनीकडून आषाढी वारी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांकडून टोल आकारणी केल्याप्रकरणी टोल प्लाझा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजयसिंग ठाकूर यांच्यासह चार जणांवर यवत पोलीस स्टेशनला महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पाटस टोल प्लाझा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजयसिंग ठाकूर , टोल वसुली कर्मचारी बालाजी वाघमोडे,टोल कंपनीचे अधिकारी सुनील थोरात व विकास दिवेकर अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,महाराष्ट्र शासनाने 7 जुलै रोजी आषाढी वारी च्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रमुख पालखी व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याचा आदेशाचे परिपत्रक काढले होते.  मात्र तरीही पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल प्लाझा कंपनीकडून आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी व भाविकांची वाहने अडवून त्यांच्याकडून टोल आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. 


महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे उल्लंघन पाटस टोल प्लाझा कंपनीकडून करण्यात आल्याने यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी फिर्याद दिल्याने पाटस टोल प्लाझा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजय ठाकूर व इतर तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र ही टोलमाफी कागदावरच असल्याचा अनुभव अनेक वारकऱ्यांना आला. याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यानंतर शिंदे सरकारने तातडीने पावले उचलली. आता वारकऱ्यांच्या वाहनाचे टोल माफ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या वाहनाला वाहतूक पोलिसामार्फत स्टिकर्स लावले जात आहेत. या स्टिकर्सवर वारकऱ्यांच्या प्रवासाचा पूर्ण तपशील असेल. तसेच पंढरपूरला जाताना आणि परत येणातानेच टोल माफ होणार आहेत. शिंदे सरकारने तातडीने निर्णय घेतल्यामुळे वारकऱ्यांही या निर्णायाचं स्वागत केले आहे.