Eknath Shinde: आज पुण्यातील बालेवाडी येथे लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमावेळी जमलेल्या बहिणींना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा असं आवाहन त्यांनी केलं आहे.


या योजनेवरती विरोधक म्हणाले लाडक्या भावाचं काय. यांना कधी तरी लाडक्या भावावर प्रेम होतं का. असतं तर ते सोडून गेले असते का. पण आम्ही लाडक्या भावांनाही शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली आहे. महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. सावत्र कपटी भावांवर मात करून आलो आहे. फक्त त्यांना लक्षात ठेवा. त्यांना योग्यवेळी जागा दाखवा. भीक देता का, विकत घेता का, लाच घेता का असे शब्द काढायला लागले. या बहिणींबद्दल असं बोलताना जनाची नाही तरी मनाची वाटायला हवी होती. ते या योजनेच्या विरोधात कोर्टातही गेले. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि बहिणींच्या बाजूने निकाल दिला. खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा, सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना दीड हजारांचे महत्व कळणार आहे का? असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यावेळी म्हणाले आहेत.


बहिणींना काहीतरी द्यायचं होतं म्हणून ही योजना सुरू..


तुम्हाला वंदनही करतो. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलात. मी अनेक बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले आहेत. सरकारच्या, भावांच्या प्रती आदर पाहिला आहे. आता आणखी दुसरं काय पाहिजे. तुमच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. या योजनेबद्दल सर्वांशी चर्चा झाली. त्याची अंमलबजावणी कशी करायची. आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं हे पाहत होतो. तुम्ही प्रपंच चालवताना कसरत करता, तसं सरकार चालवताना आम्हाला कसरत करावी लागते. पायभूत सुविधांसाठी कर्ज घ्यावं लागतं, पगार असतो, पेन्शन असतं या सर्व गोष्टी करायच्या असतात. पण आमच्या बहिणींना काही तरी द्यायचं होतं. म्हणून ही योजना जाहीर केली, असंही शिंदे (Eknath Shinde) यावेळी म्हणाले आहेत. 


अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने शब्द दिला!


आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवतं असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला संधी द्या, पुन्हा आम्हाला पाठवळ द्या, आम्ही तुमच्या खात्यात पुन्हा एकदा 90 हजार रूपये देण्याचं काम करू. आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून नेणारे नाहीत. जे बोलतो ते करतो, असंही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी बोलताना म्हणाले. 


अख्खा महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे, आमच्या मनात काही वेगळी भावना नव्हती अर्थ संकल्प मांडताना आमची बहीण, महिला सक्षम झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं होतं. विरोधक कारण नसताना टीका करत आहेत. विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिलं असं म्हणतात, मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिले आहे. यापुढे कुणीही लाईट भरू नये, कोण तुमची लाईट कट करायला येत तेच बघतो, हे भावासाठी केलं आहे. काहीजण कोर्टात गेले, पण कोर्टात टिकलं नाही, मग काय करायच असं विरोधकांना वाटायला लागलं असा हल्लाबोल अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांवर केला आहे.