मुंबई : बारामती येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांच्या आठवणींना उजाळात देत सुनेत्रा वहिनींना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्याचं आवाहन बारामतीकरांना केलं. बारामतीची आजची सांगता सभा म्हणजे अजित दादांच्या स्मृतीचा हा यज्ञ सुरू आहे, या यज्ञात आपली आहुती टाकली नाही तर मनात काहीतरी हुर हुर राहिली असती. त्यामुळेच, दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आम्ही इथं आलोय. सुनेत्रा वहिनींना (Sunetra Pawar) सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करत, बारामतीकरांनी (Baramati) आपल्या मतांची आहुती या स्मृतीयज्ञात द्यायची आहे, नाहीतर आपण करंटे ठरू, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी भावनिक आणि तितकंच जबाबदारीचं वक्तव्य केलं.   

महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेकवेळा आपण पाहील आहे की, मोठा नेता गेल्यानंतर निवडणुक आपण बिनविरोध करतो. शरद पवार यांचे आभार मानतो, त्यांचा मला काल फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की, आमचा सुनेत्रा पवारांना पूर्ण पाठिंबा आहे. मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षां देखील विनंती केली, त्यांनी ती विनंती मान्य केली. बारामतीमध्ये सभा घेताना माझ्यापैकी कुणीही आलं नसतं तरी बारामतीकरांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून दिले असते. आताचा काळ दादांच्या स्मृतींच्या आठवणींच्या यज्ञाचा काळ आहे. त्यामुळे, प्रत्येकजणाने आपली मतरुपी आहुती यात द्यायला पाहिजे. ती आहुती दिली नाही तर तो आपण स्वतःला करंटे ठरू, असे आवाहन फडणवीसांनी बारामतीकरांना केले. तसेच, बारामतीतून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा रेॉर्ड अजित दादांचा आहे, आता दादांच्या पश्चात रेकॉर्ड ब्रेक मतांनी वहिनी निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

दादांची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमती वहिनींमध्ये

दादांच्या पश्चात वहिनींनी आपल्या हातात धुरा घेतली आहे. त्या काम करत आहेत, कर्तव्याच्या भावनेतून त्यांनी धुरा आपल्या हातात घेतली आहे. त्या खासदार झाल्यापासून राजकीय अनुभवातून धुरा त्यांनी हातात घेतली आहे. अजित दादांसोबत सामाजिक, आर्थिक, शिक्षण क्षेत्रात वहिनीनी काम केलं आहे. त्यामुळे राजकारण देखील त्यांनी जवळून बघितलं आहे. मी दाव्याने सांगतो मागील दोन अडीच महिन्यात वहिनींच काम पाहिलं, त्यानंतर मी दाव्याने सांगतो दादांची सगळी स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता वहिनींमध्ये आहे. 

दादांची स्वप्न, बारामतीची कामे पूर्ण करू

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार, महाराष्ट्राला कुठे न्यायचं आहे याची कल्पना असणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार होते. असं नेतृत्व तयार व्हायला खूप वाट पाहावी लागते. राज्याचे 11 अर्थसंकल्प त्यांनी मांडले. विकसित महाराष्ट्राची पायवाट होण्याचं काम त्यांनी केलं. दादा जाणं म्हणजे महाराष्ट्राच मोठं नुकसान झालं आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात काम केलं परंतु वैयक्तिक जिव्हाळा आमचा कधीच संपला नाही. दादांसोबत काम करण्याचा आनंद वेगळा होता, कारण दादांचा स्वभाव रोखठोक होता. सरकारी काम सर्वोत्तम दिसले पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं. महाराष्ट्राला लावलेली आर्थिक शिस्त अतिशय महत्वाची आहे. निरा-कर्हा हा जोड नदीप्रकल्प त्यांच स्वप्न होतं हे काम आम्ही नक्कीच पूर्ण करू,  बारामती पाणी पुरवठा, बारामती नीरा चौपदरीकरण विषय अशी एक न अनेक कामे दादांनी हातात घेतली होती, जी आम्ही पूर्ण करू, असा विश्वास फडणवीसांनी बारामतीकरांना दिला.

देशात सर्वाधिक मतांनी विजयी करा

दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत, मात्र, या अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे पुन्हा एकदा फडणवीसांनी बारामतीकरांना उद्देशून सांगितले. निवडडणुकीची 23 तारीख दादांना श्रद्धांजली देण्याची तारीख आहे, मतदान रूपी आदरांजली देण्याची बारामतीकरांना संधी आहे, असे म्हणत सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मतांनी विजयी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्‍यांनी आपल्या भाषणातून केलं. 

हेही वाचा

Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले