पुणे: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अशात पुणे शहरासह (Pune Rain) जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर पर्यटननगरी लोणावळ्यात (Lonavala Rain) ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचलेलं आहे. तर रस्त्यांवर पाणीचं पाणी झाल्यानं, रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे. त्यामुळं स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शर्थीचे प्रयत्न करत, चाकरमानी आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कार्यालयात पोहचत आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली आहे, चोवीस तासांत या मोसमातील उच्चांकी पाऊस बरसला आहे. तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.


लोणावळा लगतच्या मळवलीमध्ये बंगल्यात पर्यटक अडकले, पर्यटकांना बाहेर काढण्यात यश


लोणावळा आणि परिसरात (Lonavala Rain) तुफान पाऊस बरसतोय, ढगफुटी सदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. याच पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे, उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल. हे सगळे पर्यटक बंगल्यात बसले होते, मात्र बाहेर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याची कल्पना यांना नव्हती. बाहेर येऊन पाहिलं असता चहुबाजूंनी पाणी झाल्याचं दिसून आलं. आता या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात येत आहे.


पुणे शहर परिसरात सोमवारपासून पाऊस सुरूच



आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी रात्रीपासून शहर परिसरात संततधार पावसाला (Lonavala Rain) सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेले दिसून आले. शहरातील मध्य भागात पावसाचा (Pune Rain) काहीसा जोर दिसून आला, तर  शिवाजीनगर परिसरात 24 तासांत सरासरी 15.5, तर चिंचवडमध्ये 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील चारही धरणांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मान्सून सुरू झाल्यापासून पुणे शहर (Pune Rain) परिसरात पहिल्यांदाच चोवीस तास पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर कमी असल्याने सोमवारी 11.5, तर मंगळवारी 4.5, असा 24 तासांत एकूण 15 मिमी पाऊस शिवाजीनगर भागात झाला.


जिल्ह्यात 24 तासांतील पाऊस 



 लोणावळा 134, लवासा 134, निमगिरी 58, चिंचवड 39.5, माळीण 34.5, खेड 25.5, तळेगाव 23, एनडीए 21, राजगुरुनगर 17, वडगाव शेरी 14, दापोडी 13.5, पाषाण 12.2, शिवाजीनगर - 15, तळेदाव ढमढेरे 7, हडपसर 6.5.