पुणे: पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने (Pune Heavy Rain) झोडपलं आहे, काल (गुरुवारी) पुण्यात पावसाने 32 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, काल शहर परिसरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आलं. मुसळधार पावसानं पुणेकरांचं मोठं नुकसानं झालं आहे, अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबई आणि पुण्यात एकाच दिवशी असाधारण पाऊस पडत आहे. हा पाऊस धरण क्षेत्रात जास्त पडतो. पाण्याचा झालेला ओवर फ्लो दुष्काळी भागात शिफ्ट करता येईल का यासाठी जागतिक बँकेची १० हजार कोटींची योजना आहे. सध्या या पुरस्थितीनंतर नुकसान भरपाई करणं एवढचं आपल्या हाती आहे. याचे पंचनामे सुरू होतील आणि पुढची काम देखील सुरू होतील. तर पाटबंधारे खात्याने वेळेवर सूचना दिल्या आहेत असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.


पुणे शहर परिसरात निर्माण झालेली परिस्थिती ही नदी पात्रातील बांधकाम, अनधिकृत नाले यांच्यामुळे झाली आहे. नदी काठच्या लोकांना शिफ्ट करणे हाच त्यावरील उपाय आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तर विरोधकांच्या टिकेवर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले,  चौकात बसून मत देण्याचा फार मोठा प्रकार आपल्याकडे आहे. नदीत भराव टाकल्याने पूर आला नाही. मी कालपासूनच नुकसान भरपाई देण्याला सुरुवात केली आहे. पंचनाम्याची फार वाट बघणारा नाही, असंही ते पुढे म्हणालेत.


नदी सुधार प्रकल्पावर दिली प्रतिक्रिया


नदी सुधार प्रकल्पामुळे पूरस्थिती निर्माण झाली अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, पुण्यातील नदी सुधार प्रकल्प एका रात्रीत उभे राहत नाहीत. यासाथी मोठे सर्व्ह लागतात, कोर्ट कचेरी होतात. यामुळे जर पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली असं वाटत असेल तर तसं मत तज्ज्ञांनी व्यक्त करावं, असं देखील चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) म्हटलं आहे.


खडकवासला धरणातून विसर्ग कमी



खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.


एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित



पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी हे अजून महानगरपालिकेकडून  पोहोचवण्यात आलेलं नाही.तसेच  वापरण्यासाठी पाणी नाही.या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. पाणी ओसरल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी या ठिकाणी येऊन साफसफाई करत आहेत.