Chandrakant Patil : पुण्यातील (Pune) 18 पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून बाकी पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल आणि त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केले. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या बालस्नेही कक्षाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बालकांशी संवाद साधला आणि त्यांना चॉकलेटचं वाटप केलं.
कायद्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाची सुरुवात होणार आहे. लहान बालके व महिलांवर अन्याय व अत्याचार झाल्यास ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीसांची भिती वाटू नये, त्या ठिकाणी विश्वास वाटावा, दडपण येऊ नये यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. बालस्नेही कक्षात येणारे अत्याचारित बालक, विधीसंघर्षग्रस्त बालक बोलके व्हावे, गुन्ह्याची नोंद होईपर्यंत त्यांच्या बसण्याची, रमण्याची, खेळण्याची व्यवस्था करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कक्ष उभारण्यासाठी सामाजिक उत्तर दायित्व निधीसोबतच जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल.
का उभारण्यात आला बालस्नेही कक्ष?
आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून स्वारगेट पोलीस ठाणे अंतर्गत बालस्नेही कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस ठाणे परिसरातील रंगरंगोटी व स्वच्छता तसेच नुतनीकरण पुणे पोलीस मास निधीतून करण्यात आले आहे. कायद्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल कल्याण कल्याण पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे. बालकांचे जबाब नोंदवितांना त्यांच्यावर दडपण येऊ नये यासाठी हे बालकल्याण पोलीस अधिकारी पिडीत बालक, विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत संवाद साधतील तसेच त्यांना समुपदेशन करण्यात येईल. अत्याचारग्रस्त पिडीत बालक त्यांच्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती विश्वासाने व मनमोकळेपणाने देण्यासाठी कक्षात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी येथे प्रयत्न केला जाणार आहे.
बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी त्यास प्रोत्साहित करणे. बालक गैरवर्तन करु नये याकरीता त्यांच्यामनात सकारात्मक विचार निर्माण करणे. बालकाला घडलेल्या घटनेची माहिती देण्यासोबत त्यास समुपदेशन व मानसशास्त्रीय आधार किंवा वैद्यकीय उपचार देणे आदी काम या ठिकाणी होणार आहे. स्वारगेट पोलीस ठाणे व होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन यांच्या समन्वयाने बालस्नेही कक्षाचे कामकाज करण्यात येणार आहे.