Chandrakant Patil In Pune: राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजय झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सगळीकडे जल्लोष साजरा केला. पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामुळे 'ये तो बस्स झॉंकी हैं पुणे महापालिका बाकी हैं!' चा नारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात दिला. 


पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाचं आयोजन केलं होतं. कोथरुड परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी जो डाव टाकला, त्यामुळे संजय राऊतांनाही चितपट व्हावे लागले, असं ते म्हणाले. 


यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपूरे, दत्ताभाऊ खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्रबापू मानकर, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


'ये तो बस्स झॉंकी हैं 20 तारीख बाकी हैं,' म्हटलं होतं. पण आज 'ये तो बस्स झॉंकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!' हे आपल्याला दाखवायचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षच पुन्हा विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत रुजू होतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला‌.


दरम्यान, या विजयी जल्लोष कार्यक्रमात भाजपचा ध्वज खांद्यावर घेऊन सर्व कार्यकर्त्यांसह गाण्यांच्या तालावर ठेका धरला आणि त्यांच्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष गार्डन येथे कार्यकर्त्यांकडून दादांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.