CET Scam Allegation : सीईटी सेल भ्रष्टाचार अन् खंडणीखोरीचं केंद्र, रोहित पवारांचा आरोप; धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे? विद्यार्थ्यांचा आरोप
CET Exam Scam Rohit Pawar Allegations: सीईटी परीक्षेत डेटा लीक आणि घोटाळा झाल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

CET Exam Data Leak Scam : राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या सीईटी (CET) परीक्षेत आणि कथित डेटा लीक प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलीस प्रशासन आणि सीईटी सेलवर (CET Cell) सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा प्रचंड राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Rohit Pawar Direct Attack : "सीईटी सेल भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीचे केंद्र"
पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सीईटी सेलच्या मुंबईतील कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. "सीईटी सेल हे सध्या भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीचे मुख्य केंद्र बनले आहे," असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सीईटी सेलने डेटा लीक झाल्याची बाब अंशतः मान्य केल्याचे समोर येत आहे.
Eduspark Tender Scam : टेंडर फेरफार करून 850 कोटींचे कंत्राट
या घोटाळ्याच्या मुळाशी जात रोहित पवार यांनी एज्युस्पार्क (Eduspark) या कंपनीवर गंभीर आरोप केले. टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर फेरफार करून एज्युस्पार्क कंपनीला तब्बल 85 कोटी रुपयांची कंत्राटं देण्यात आली, असा दावा त्यांनी केला.
धाराशिव जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी थेट बंगळुरूला जाऊन एज्युस्पार्क कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला आणि गैरमार्गाने उच्च पर्सेंटाईल (Percentile) मिळवले, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच 2021 मध्ये उदय सामंत तंत्रशिक्षणमंत्री असतानाच्या काळापासूनच या कंपनीला कंत्राटे देण्यास सुरुवात झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Whistleblower Advait Joshi : धाराशिवमधील 6 जणांना 100 पर्सेंटाईल कसे?
सीओईपी (COEP) इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथील माजी विद्यार्थी अद्वय जोशी यांनी या घोटाळ्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. "सीईटी परीक्षेत गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घोटाळा होत आहे. आम्ही सीईटी सेलला पुराव्यांसह सर्व माहिती दिली, पण ते कारवाई करत नाहीत. राज्यात 100 पर्सेंटाईल मिळवणारे सर्वच विद्यार्थी आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. धाराशिव जिल्ह्यातील एकाच गावातील तब्बल 6 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळाले आहेत, हे कसे शक्य आहे?" असा सवाल जोशी यांनी उपस्थित केला.
अद्वय जोशी यांनी आव्हान दिले की, "ज्या कंपनीला हे काम दिले आहे, तिथल्या कर्मचाऱ्याने बेंगलोरमधून पर्सेंटाईल वाढवण्याचे काम केले आहे. मी कोणत्याही व्यासपीठावर समोरासमोर येऊन पुरावे सादर करायला तयार आहे. पुरावे खोटे ठरल्यास सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे."
COEP Alumni Protest : चुकीच्या मार्गाने प्रवेश मिळवणाऱ्यांवर कारवाईची मागणी
सीओईपीचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन या भ्रष्टाचाराविरोधात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे अद्वय जोशी यांनी स्पष्ट केले. आमच्या नामांकित महाविद्यालयात अशा गैरमार्गाने गुण मिळवून विद्यार्थी प्रवेश घेणार असतील, तर ते प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.
त्यामुळे या संपूर्ण डेटा लीक आणि पर्सेंटाईल घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















