(Source: Poll of Polls)
Amol Kolhe: मंत्री केसरकर आता 'आर्य'चा जीव परत आणू शकतात का? प्रशासन गेंड्याच्या कातडीचं, अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
Amol Kolhe: सरकारने कर्जमाफीसाठी 30 जून तारीख ठरवली; विधानसभेपूर्वी सरकारने कर्जमाफीचं आमिष दाखवलेलं होतं, असं म्हणत अमोल कोल्हेंचा हल्लाबोल केला आहे.

मुंबई: मुंबईतील पवई भागात काल घडलेल्या घटनेनं राज्य हादरलं. रोहित आर्यने आपली मागणी मान्य करण्यासाठी लहान मुलांना ओलीस ठेवलं होतं, त्या मुलांची सुटका करताना पोलिसांकडून (Police) त्याचं इन्काऊंटर झालं. या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले, घडलेली घटना ही दुर्दैवी आहे, रोहित आर्य याने जो काही मार्ग निवडला त्या मार्गाचा समर्थन होऊ शकत नाही. परंतु राज्यातील देशातील नागरिकाला अशा पद्धतीने आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची वेळ का येते, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी दोन वेळा उपोषण केलं होतं. ज्या खात्याच्या संदर्भात त्यांचा विषय होता त्या मंत्री महोदयांनी त्यांची भेट घेऊन याबाबत आश्वासन देखील दिलं होतं. तरीही विषय सुटत नव्हता. त्यानंतर देखील इतक्या गेंड्याच्या कातडीच्या शासन आणि प्रशासन काम करत असेल तर या प्रशासनाचे प्रमुख म्हणून शासनाच्या प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराजांच्या समोर नतमस्तक होण्याचे होर्डिंग्स लावतात, तेव्हा पुन्हा तोच प्रश्न येतो रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी छत्रपतींची शिकवण एकीकडे आणि दुसरीकडे आपली मागणी त्यांच्या मते न्याय मागणी मांडण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब करावा लागावा त्या घटनेमध्ये त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो हे घटना अत्यंत दुर्दैव आहे,असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. (NCP Sharad Pawar)
Amol Kolhe: कितीतरी कंत्राटदारांची बिल थकीत
सरकारने याबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सरकारमध्ये जर नैतिकता नावाचा शब्द शिल्लक असेल तर या प्रश्नाचे उत्तर सर्वसामान्य जनतेला द्यायला हवं. कितीतरी कंत्राटदारांची बिल थकीत आहेत. ही गोष्ट समोर येते तर दुसरीकडे राज्याचे प्रमुख जाहिरातींवर शेकडो कोटी रुपये खर्च करतात हेही दृश्य आपल्यासमोर आहे. जाहिरातींवर कोटी रुपये खर्च होत असताना दुसरीकडे एका व्यक्तीला त्याचं असणारं बिल त्याने व्हिडिओमध्ये मांडलेल्या त्यानुसार आपल्या बिल मिळवण्यासाठी अशा मार्गाचा अवलंब करावा लागत असेल तर हे नक्की दुर्दैवी आहे आणि सरकारचे अपयश आहेत, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
Amol Kolhe: वेगळा चुकीचा मार्ग निवडला गेला
मंत्री दीपक केसरकर यांच्या या उशिरा जाग येण्याने जर घडलेली घटना ही पुन्हा बदलता आली असती तर मंत्री महोदयाच्या विधानाला काहीतरी किंमत होती. एका माणसाचा जीव गेला आहे. एक वेगळा चुकीचा मार्ग निवडला गेला आहे ही गोष्ट जेव्हा समोर येते, देशातल्या सर्वात प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या राज्यात एका नागरिकाला आपली मागणी मांडण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब करावा लागत असेल तर मग हे शासनाचे निघालेले दिंडवडे आहेत. त्यानंतर आता आलेल्या केसरकर यांच्या कुठल्याही वक्तव्याने झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? याचे उत्तर स्वतः मंत्री महोदयांनी द्यावं असंही खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
Amol Kolhe: प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे
रोहित आर्यच्या एन्काऊंटर नंतर मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्याला आता काही अर्थ उरलाय का? आता त्यांच्या बोलण्यानं आर्यचा जीव परत येणार आहे का? असा खडा सवाल शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हेनी उपस्थित केलाय. आम्ही रोहित आर्यने उचलेल्या पावलांचे मुळीच समर्थन करणार नाही, पण हे असं कृत्य करण्याची वेळ त्याच्यावर का आली? यातून सरकार आणि प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे, हे स्पष्ट झालं. आता सरकार नैतिकता दाखवत उपस्थित सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत, अंतर्मुख होऊन खुलासे करावेत, असं म्हणत कोल्हेंनी सरकार समोर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
Amol Kolhe: म्हणून सरकारने कर्जमाफीसाठी 30 जून तारीख ठरवली - अमोल कोल्हे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेऊन सरकारने कर्जमाफीची फसवी तारीख जाहीर केली आहे. सरकार शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चेष्टा करतंय, असं म्हणत शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हेनी संताप व्यक्त केला. विधानसभेपुर्वी सत्तेत येण्यासाठी या सरकारने कर्जमाफीचं आमिष दाखवलं होतं. आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतरची म्हणजे 30 जून 2026 ही तारीख कर्जमाफी जाहीर करण्यासाठी निवडली आहे. त्यामुळं सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चेष्टा करणार, फसवणूक करणार हे उघड आहे, असं म्हणत कोल्हेंनी सरकारवर सडकून टीका केली.




















