Shankar Mandekar: भावाचा कलाकेंद्रात गोळीबार; राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर भावनिक, वारकरी समाजाची माफी मागत म्हणाले...
Shankar Mandekar: आमदार शंकर मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते भावूक झाले होते. यावेळी मांडेकर यांनी वारकरी समाजाची माफी देखील मागितली आहे.

पुणे : ताही दिवसांपूर्वी दौंडमधील एका कला केंद्रात गोळीबार झाला होता. हा गोळीबार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदाराच्या भावाने केल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर शंकर मांडेकर यांच्यावर टीका करण्यात येत होती. याबद्दल आता बोलताना शंकर मांडेकर यांना अश्रू अनावर झाले आहेत. आमदार शंकर मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मांडेकर यांनी वारकरी समाजाची माफी देखील मागितली आहे.
ज्यांनी चुकी केली त्याचा त्रास त्यांना होतोय...
शंकर मांडेकर कार्यक्रमावेळी बोलताना म्हणाले, मी नेहमी सांगतो मी माळकरी नाही पण वारकऱ्यांनी आणि माळकरांनी माझ्यावर एखाद्या साधुसंताप्रमाणे प्रेम केलं, याची जाणीव मला आहे. माझ्या कुटुंबातील सगळे सदस्य इथे आहेत कैलास मांडेकर यांचे नाव घ्यायला मी मुद्दाम मागे ठेवले. कारण काही काळापूर्वी एक चुकीची घटना घडली, त्यानंतर पत्रकारांनी मला घेरलं आणि विचारलं तुम्ही टोपी घालून समाजकारण आणि राजकारण करता तुम्ही स्वतःला वारकरी समजता मग हे कसं घडलं?, मी वारकरी नाही पण वारकऱ्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझी श्रद्धा वारकऱ्यांवर आहे. जे चुकीचं घडलंय त्याला काय शासन जायचं ते माझे वारकरी करतील. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं ज्याने चुकीचं काम केलं ते त्याचं बघतील तुम्ही तुमचं काम करा. मी संपूर्ण वारकऱ्यांची माफी मागतो ज्यांनी चुकी केली त्याचा त्रास त्यांना होतोय आणि त्या चुकीची फळ त्यांना मिळत आहेत, असे मांडेकर यांनी पुढे म्हटलं आहे.
जे चुकीचं काम करतात त्यांना....
पुढे माझे जे भावंड आहेत ते समाजामध्ये माझे प्रतिनिधी म्हणून काम करतात. पण, मला या गोष्टीचं वाईट वाटत आहे, असं म्हणत शंकर मांडेकर यांना अश्रू अनावर झाले. या समाजात मी कधीच कोणतच चुकीचं काम करणार नाही. शरीर हे बळदंड असलं पाहिजे. मात्र, जे चुकीचं काम करतात त्यांना मुळासकट उपटून टाकलं पाहिजे. कारण ही समाजाला लागलेली कीड आहे ही कीड नष्ट करण्याचं काम मी करत आहे, असे मांडेकर यांनी सांगितले. मी वारकरी संप्रदायाला जाहीर सांगतो वारकऱ्यांना कधी कमीपणा येईल असं मी वागणार नाही. माझ्या भावाची चूक झाली मात्र भविष्यात अशी चूक होणार नाही, याची मी काळजी घेईल असा विश्वास मी वारकऱ्यांना देतो. या कालावधीमध्ये वारकऱ्यांसोबत मला काही नेत्यांची साथ लाभली विरोधकांनी टीका केली मात्र नेत्यांनी हे स्पष्ट सांगितलं की मांडेकरांची चुकी नसेल मी त्यांना दोषी धरणार नाही, ही नेत्यांनी मला दिलेली ताकद आहे. याची जाण ठेवूनच आगामी काळात माझं काम सुरू राहील, असे म्हणत शंकर मांडेकर यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांचे आभार मानले
आमदार शंकर मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते भावूक झाले होते. यावेळी मांडेकर यांनी वारकरी समाजाची माफी देखील मागितली आहे.#Punenews #MLA #NCP #ShankarMandekar pic.twitter.com/Bk21z86fCP
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 13, 2025























