उमेदवारीसाठी दिलेले पैसे परत मिळावे यासाठी भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रोडवरील पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. तिकीट द्यायचं नव्हतं तर उमेदावारीसाठी पैसे कशाला घेतले असा सवाल उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याचं माहिती आहे.
पैसे परत मागणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या लेटरहेडवर निषेधाचं पत्र लिहिलं आहे. उमेदवारीसाठी घेतलेले कष्टाचे अकरा हजार रुपये परत करावेत, अन्यथा चक्री उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नाराज कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांना मध्यस्थी करावी लागली. बापटांकडून त्यांची समजूत काढण्यात आली, मात्र आंदोलनकर्त्यांनी गिरीश बापट यांच्याशी हुज्जत घातली.
इच्छुक उमेदवारांकडून घेतलेले पैसे पक्षनिधीमध्ये जमा केल्याचं स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे इच्छुकांकडून खरंद उमेदवारीच्या आमिषाने पुणे भाजपने पैसे उकळले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.