पुणे: राज्यात तीन पक्षांचं मिळून महायुती सरकार स्थापन झालं. मात्र, या पक्षातील कार्यकर्ते नेते, आमदार, खासदार यांच्यातील धुसफूस अनेकदा पहायला मिळते, गेल्या काही दिवसांपुर्वी शिवसेना पक्षाचे मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य असो किंवा मग जागांवरून सुरू झालेली धुसफूस असो. अशातच पुण्याची विधानसभेची जबाबदारी मिळालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज  वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील 150 कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आम्ही राष्ट्रवादीचं काम करणार नाही असा इशारा दिला आहे. 


लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुरलीधर मोहोळ यांचं काम केलं नाही, असं म्हणत कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची तक्रार केली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे ठेवावा अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे. अर्जुन जगताप वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टीला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी अन्यथा आम्ही काम करणार नाही असं वक्तव्य अर्जुन जगताप यांनी केलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीची तयारी करणाऱ्या सुनील टिंगरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


कार्यकर्ते आणि  मतदारसंघाचे अध्यक्ष यांच्या तक्रारीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया


या कार्यकर्ताच्या भावना आहेत. हे नैसर्गिक आहे. प्रेत्येक कार्यकर्त्यांला वाटत मतदार संघ आपल्याला भेटावा. भाजपाचा कार्यकर्ता शिस्तप्रिय आहे. तो महायुतीचे काम करेल. संघटना म्हणून आमचं काम चालू आहे. जागा वाटपाचा निर्णय वरच्या पातळीवर होईल.100% सर्व कार्यकर्ताचे समाधान होणार आहे. फार नाराजीचे वातावरण नाही असंही मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं आहे. 


राष्ट्रवादी महायुतीत आल्यानंतर पंकजा मुंडेंचं पहिल्यांदांच वक्तव्य


आयुष्यभर आपण ज्यांच्या विरोधात होतो ते आपल्या सोबत आले आहेत. राजकरणात राजकीय तह करावे लागतात, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रात तयारी करत आहेत, त्यांच्यावर पक्षाकडून ही जबाबदारी देण्यात आली आहे, आज त्यांनी पुण्यात मेळावा घेतला यावेळी जमलेल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


काय म्हणाल्या पंकजा मुंडे?


पक्षाचा एक कार्यकर्ता लाभ मिळाला नाही म्हणून नाराज होत नाही, तर सन्मान मिळाला नाही म्हणून नाराज होतो. अशातच आता महायुती झाली आहे ती वेगळी आहे, हा वेगळा अनुभव आहे, जेव्हा आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो, तेव्हा नवे अनुभव येत असतात. आता शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, आपण आयुष्यभर ज्यांना विरोधक मानत होते ती राष्ट्रवादी काँग्रेस त्यातील एक गट फुटला तो आपल्या बरोबर आला. पण सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तह करावे लागतात, काही गणित बांधावी लागतात. ती वरिष्ठांनी बांधली असावीत. आपण, नाराज होते, ते आपल्या सोबत आहे असं झालं, नाराजी चुकीची नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.