पुणे :  भाजप (BJP) आमदार सुनील कांबळेना (Sunil Kamble) पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलणं  भोवलं आहे.  पोलीस काँन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील कार्यक्रमात आमदारांनी कानशिलात लगावली होती. सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्याही कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात  पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी उमुख्यामंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील ससून रुग्णालय बी जे मेडिकल कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी सरक यांच्या कानशिलात लगावली होती. सोशल मीडियावर झालेल्या व्हिडीओ ने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून लावली होती. विरोधकांनी देखील भाजप आणि सरकार विरोधात टिप्पणी केली होती. अखेर रात्री या मारहाण प्रकरणी आता कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं काय घडले?


पुण्यात ससून रूग्णालयात तृतीयपंथीयांसाठी  स्वतंत्र वॉर्डचं उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होतं. 
मात्र कार्यक्रम पत्रिकेत आपलं नाव छापलं नाही म्हणून आमदार कांबळे संतापले.अजित पवार गटाचे वैद्यकीय मदत कक्षाचे
महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना आमदार कांबळे यांनी कानशिलात लगावली.  त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर स्टेजवरून खाली  उतरत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याच्याही कानशिलात कांबळेंनी आवाज काढला.  जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैदकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समोर समोर आलेय.


मी फक्त ढकललं, मारहाण केलीच नाही : भाजप आमदार सुनील कांबळे


भाजप आमदार सुनील कांबळे बोलताना म्हणाले की, "मी कार्यक्रमातून बाहेर पडलो. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता, गोळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळे घाईगडबडीत बाहेर पडलो. कार्यालयात आल्यावर मला माहिती पडलं की, हे सगळं लाईव्ह सुरू झालेलं आहे. काय झालंय हेच मला कळालं नाही, मी कोणालाच मारहाण करण्याचा संबंधच नाही. तो कोण व्यक्ती आहे, मी त्याला ओळखत नाही, मी का मारू त्याला?"


घटनेची माहिती अजित पवारांना देऊ : सातव 


अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी कानशीलात लगावली.कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याचे म्हणत आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सातव यांच्या कानशीलात लगावली. यानंतर सातव यांनी आपण या घटनेची माहिती अजित पवारांना देऊ अस म्हटलंय.


हे ही वाचा :


मी फक्त ढकललं, मारहाण केलीच नाही; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार सुनील कांबळेंचं स्पष्टीकरण