पुणे: भाजपच्या चिंचवडमधील आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) वीस नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, ही बातमी व्हायरल करणाऱ्या अज्ञाताविरोधात भाजपने थेट पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चिंचवड विधानसभेतील 35 माजी नगरसेवकांच्या संमतीने पोलीस आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली आहे. भाजपसह अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि कुटुंबाची बदनामी करण्याचं षडयंत्र यामागे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतः अश्विनी जगतापांनी सुद्धा या बातमीत तथ्य नसल्याचा खुलासा ही केला आहे.


अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा


भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातं आहे. तर याबाबत भाजप आमदार अश्विनी जगताप यांना स्पष्टीकरण दिलं आहे. चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) तुतारी फुंकणार, या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. विरोधकांनी हे घडवून आणलेलं षडयंत्र आहे. असा दावा करत मी भाजपकडूनच चिंचवड विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचं अश्विनी जगतापांनी ठामपणे सांगितलं आहे. माझे दिर शंकर जगताप आणि माझ्यात कोणते ही वाद नाहीत. त्यामुळं पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर मी त्यांचा प्रचार करत त्यांना निवडून आणेन. असा विश्वास देखील अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे. 


एबीपी माझाशी बोलताना भाजप आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) म्हणाल्या, या चर्चा सुरू आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही. कोणीतरी या चर्चा सुरू केल्या आणि बाकी विरोधक या चर्चांना खत-पाणी खालत आहेत. लक्ष्मण जगताप यांनी ज्या पक्षाची निष्ठा राखली, ती निष्ठा आम्ही कोणीच मोडणार नाही, लक्ष्मण जगताप यांच्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, पक्षाने संधी दिली त्यामुळे मी पक्षाला सोडणार नाही, असंही अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी म्हटलं आहे.


पिंपरी चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल


नामदेव जनार्दन ढाके मा सभागृह नेता पिं.चिं. मनपा तथा महामंत्री भाजपा पिं. चिं. शहर जिल्हा बुधवार दिनांक १८/०९/२०२४ रोजी सोशल मिडीयावर मोबाईल क्र. ९३७३९४१३८१ यावरुन दुपारी १२.३० च्या सुमारास मा. भाजपा आमदार तसेच भारतीय जनता पार्टी चे २० नगरसेवक पक्ष सोडणार असल्याची खोटी बातमी पसरवण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टी ला बदनाम करण्याचे षडयंत्र यातुन दिसुन येत आहे. शहराध्यक्षांचे, आमदारांचे व २० नगरसेवकांचे ना पत्र, ना संमती नसताना जाणीव पुर्वक जगताप कुटुंब व भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक या सर्वांबद्दल नागरिकांमध्ये सभ्रम तयार करुन पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा स्वच्छ उद्देश दिसुन येत आहे. तरी वरील मोबाईल क्रमांका वरुन सोशल मिडीयावर खोटी बातमी वॉटसअॅप द्वारा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी वरील नंबर व त्या व्यक्तीची सखोल चौकशी करुन त्वरीत कारवाई करण्यात यावी ही विनंती.