शिरुर, पुणे : शिरूर लोकसभेत (Shirur Loksabha Constituency) अजित पवारांनी शिवाजी आढळरावांना (Shivaji Adhalrao Patil) उमेदवारी दिली. त्यानंतर केवळ राष्ट्रवादीत नव्हे तर भाजपमध्ये ही खदखद निर्माण झाली आहे. हीच खदखद दूर करण्यासाठी महायुतीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उदय सामंतांच्या (Uday Samant) उपस्थितीत पार पडली. त्याचनुषंगाने दोन्ही नेत्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता महायुतीत खदखद असल्याची कबुली दोघांनी ही दिली. तर एखाद्या मुलाने कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं. तर काही दिवस कुटुंबात खदखद असतेच, पण कालांतराने ती सून कुटुंबाची आवडती बनते, असं भाष्य आढळरावांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या खदखदीवर चंद्रकांत पाटलांनी केलं. तर भाजपमधील नाराज पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत दादांच्या उपस्थितीने संकेत मिळालेले आहेत. त्यामुळं महायुती पुढच्या टप्प्यात जोमाने प्रचार करतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
कुटुंबातील एका मुलाने न कुटुंबाला आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं. काही दिवस खदखद असते, पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते, असं उदाहरण देत चंद्रकांत पाटलांनी खदखद दूर झाल्याचं सांगितलं. अजूनही चाळीस दिवस आहेत. या छोट्या-छोट्या चुका सुधारल्या जातील. घटना घडली की त्यात सुधारणा करत जाऊ,असंही त्यांनी स्पष्ट केलं. - प्रत्येक कुटुंबातील रक्ताच्या नात्यात ही कुरघोडी सुरूच असते. त्यामुळं हे वाद संपविण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखाची असते. इथं तर वेगवेगळ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते-पदाधिकारी आहेत. त्यांची ध्येय-धोरणं आहेत, त्यामुळं तेवढं चालायचं, म्हणत चंद्रकांत पाटलांनी अनेक मुद्यांवर सारवासारव केली.
नाराजीनाट्य होऊ नये म्हणून बैठका; उदय सामंत
शिरुर लोकसभेसंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, शिरूर लोकसभेत महायुतीत कोणतं ही नाराजीनाट्य होऊ नये, म्हणून आज तीन प्रमुख पक्षांसह घटक पक्षांची बैठक झाली. समन्वय साधण्याचाचं हा प्रयत्न होता, आता यापुढं फक्त प्रचार सुरू राहील. त्यासोबतच शिवाजी आढळरावांचा पहिल्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. आजच्या बैठकीनंतर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने प्रचारात उतरतील. सगळे एकदिलाने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाची बातमी-