पुणे: पुण्यातील पीएमपीएल बसमध्ये विनापरवानगी रिल्स प्रकरणामध्ये रिलस्टार अथर्व सुदामेला प्रशासनाने तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड जमा न केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीस प्रशासनाने त्याला पाठवली आहे. पूर्वपरवानगी न घेता, पीएमपीच्या बसमध्ये रील्स तयार करून, त्यामध्ये महामंडळाचा गणवेश, ई-तिकीट मशिन आणि बॅच बिल्ल्याचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी रील्स स्टार अथर्व सुदामे याला पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नोटीस बजावली होती.
गणवेश परिधान करून, ई-तिकीट मशिन हातात घेऊन रील्स बनवले
अथर्व सुदामे याने पीएमपी बसमध्ये वाहकाचा गणवेश परिधान करून, ई-तिकीट मशिन हातात घेऊन रील्स बनवले होते. ते रील त्याने त्याच्या सोशल मिडायवरती शेअर केले होते. संबंधित रील्समध्ये एक महिला आणि एक पुरुष असून, महिलांविषयी आशय असल्याचे नमूद करण्यात आले होते. या रील्समुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप प्रशासनाने केला होता. संबंधित रील तत्काळ इन्स्टाग्रामवरून हटवावी, तसेच या प्रकरणी सात दिवसांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्यांकडे लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस त्याला देण्यात आली होती. अन्यथा संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात इशाराही देण्यात आला होता.
पीएमपीकडून ५० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई
मात्र आता पीएमपीएलकडून अथर्व सुदामेला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे महानगर परिवहनमहामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये विनापरवानगी चित्रीकरण करून सोशल मीडियावर रील प्रसारित केल्याप्रकरणी अथर्व सुदामेवर पीएमपीकडून ५० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पीएमपीकडून २ जानेवारीला सुदामेला नोटीसबजावण्यात आली होती. यात सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मुदतीत खुलासा न दिल्याने महामंडळाने त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान अथर्व सुदामेने अजूनही ते रील इंस्टग्रामवरून काढलेले नाही. तसेच ७ दिवसांमध्ये लेखी खुलासाही प्रशासनाकडे सादर केलेला नाही. अखेर पीएमपी प्रशासनाने सुदामेला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंड जमा न केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीसही त्याला पाठवली आहे.