PCMC Crime News : बेपत्ता लोकांना शोधून सुरक्षित घरात आणण्यासाठी भोसरी पोलिसांनी महत्वाची कामगिरी केली आहे. एका वर्षात 464 बेपत्ता लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस तपासात हरवलेल्या पुरुष, महिला आणि बालकांचा तातडीने शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस ठाण्यात विशेष शोध पथक तयार करण्यात आले. या पथकातील पोलीस अधिकारी सचिन जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गेल्या 27 वर्षातील बेपत्ता व्यक्तीच्या नोंदींची संपूर्ण माहिती घेऊन एका वर्षात एकूण 309 हरवलेल्या पुरुष, महिला आणि बालकांचा शोध घेण्यात यश मिळवलं आहे.
याशिवाय भोसरी पोलीस ठाण्यातील एकूण 40 पोलीस अधिकाऱ्यांनी 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान बेपत्ता ऑपरेशन राबवून 200 पैकी 155 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे भोसरी पोलिसांनी 464 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि त्यांच्या पथकाच्या कार्याचे शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भोसरी वगळता एकाही पोलीस ठाण्याला आतापर्यंत बेपत्ता लोकांची आकडेवारी किंवा अहवाल देता आलेला नाही. भोसरी पोलिसांनी हे मोठं यश प्राप्त केलं आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे गुन्हेगारांपेक्षा मोठे आव्हान होते जे भास्कर जाधव आणि त्यांच्या टीमने स्वीकारले. ही कारवाई भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि शोध पथकाने केली. यामध्ये चिंचवड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी जमदाडे यांनी विशेष सहकार्य केलं आहे.
कुटुंबीयांनी मानले पोलिसांचे आभार
घरातील व्यक्ती बेपत्ता झाला तर त्याचा त्रास घरातील प्रत्येकाला होत असतो. गेली अनेक दिवस बेपत्ता असलेले व्यक्ती परतण्याची वाट बघत असतात. बेपत्ता असलेल्या कुटुंबीयातील सदस्याला घरी परत आणणं पोलिसांच्या हातात होतं. या पोलिसांनी विशेष मोहिम राबवत कुटुंबातील सदस्याला घरी पोहचवल्यामुळे अनेकांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याच्या या विशेष कामगिरीचं सगळीकडे कौतुकही होत आहे.