पुणे : पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीविरोधात भीम आर्मीनं वेगळ्या पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसमोरच बिर्याणी खात विद्यापीठाच्या वादग्रस्त निर्णयाचा निषेध करण्यात आला.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.



केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट त्यात आहे. पत्रकात अटींची मोठी जंत्रीच देण्यात आली आहे. विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थी या पदकासाठी पात्र असेल. १५ नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत.

शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक मिळणार, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा

विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा. अशी अजब अट यामध्ये देण्यात आली आहे.

केवळ शाकाहारी विद्यार्थ्यांनाच शेलारमामा पुरस्काराअंतर्गत सुवर्णपदक देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठत आहे. दरम्यान भेदभाव करणाऱे सर्वच पुरस्कार बंद करण्यात यावेत, असे आदेश राज्य सरकारनं राज्यातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत.