Bhigwan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधारगृहात रवानगी करण्याचा निर्णय, पोलीस सूत्रांची माहिती, तरुणाबद्दल नवी अपडेट समोर
Bhigwan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची रवानगी सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर तरुणाची चौकशी करुन अंतिम निर्णय होणार आहे.

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण प्रकरणातील अपहरण झाल्याची तक्रार असलेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली. संबंधित तरुणासह मुलगी भिगवण पोलीस ठाण्यात पोहोचली. यानंतर पोलीस संबंधित तरुणाला दुसरीकडे घेऊन गेले होते. यानंतर मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. पोलिसांनी संबंधित तरुणीला साडे बारा वाजता कोर्टात हजर केलं. यानंतर संबंधित तरुणीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, मुलाची चौकशी करुन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
भिगवणच्या तरुणीची सुधारगृहात रवानगी
भिगवण घटनेतील मुलीला सुधार गृहात तिची रवानगी करण्यात आली. तर मुलाबाबत चौकशी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण घटनेतील युवतीला आज कोर्टात हजर केल्यानंतर तिचा जबाब नोंदवला गेला. जबाब नोंदवल्यानंतर मुलीचे मेडिकल करून पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली. तर मुलाबाबत चौकशी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
तरुणी आणि तरुण बारामतीत दाखल होण्यापूर्वी कुठं कुठं गेले?
मुलगा आणि मुलगी भिगवममधून बाहेर पडल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले.
पोलीस काय म्हणाले?
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती दिली. मुलीच्या आई आणि भावाचं म्हणणही ऐकून घेतलं आहे. त्या मुलीने आपल्या आई आणि भावासमोर देखील आपलं म्हणणं मांडलं आहे. मात्र तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्याने आम्ही आता आणखी चौकशी करत आहोत. संबंधित तरुणीने कोर्टासमोरही तिचं सगळं म्हणणं मांडलं आहे.
संबंधित तरुणीचं शपथपत्र
संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेलो, असं म्हटलं आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.
























