पिंपरी चिंचवड : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले आहेत. नाभिक संघटनेने त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. "रावसाहेब दानवे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी केले जाणार नाही," असा इशारा यावेळी देण्यात आला.


काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. "महाविकास आघाडी म्हणजे अर्धवट काम करणारे तिरुपतीचे न्हावी आहेत," अशा प्रकारचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या राजकीय भाषणात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नाभिक समाज आक्रमक झाला आहे. राज्यभर ठिकठिकाणी नाभिक समाज आंदोलन करुन रावसाहेब दानवे यांचा निषेध करत आहे.


नाभिक समाजाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याबाबत रावसाहेब दानवेंनी माफी मागावी म्हणून आज (14 मार्च) पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन करण्यात आलं. दानवे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी न करण्याचा इशारा देण्यात आला.


दानवेंना लातूरमध्ये फिरु देणार नाही : नाभिक समाजाचा इशारा
त्याआधी 9 मार्च रोजी लातूरमध्येही रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. गांधी चौकात दानवेंच्या अर्धमुंडन फोटोला जोडे मारो आंदोलन नाभिक समाजाने केले होते. दानवे यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अन्यथा राज्यभर नाभिक समाज तीव्र आंदोलन करेल. तर यापुढे लातूर जिल्ह्यात दानवे यांना फिरु देणार नाही, असा इशारा नाभिक समाजाकडून देण्यात आला होता. 


याआधी अलिबाग, अहमदनगर, नाशिकसह अनेक जिल्ह्यात नाभिक समाजाने आंदोलन करुन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनं दिली. दरम्यान या प्रकरणी रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.


दानवेंची वादग्रस्त वक्तव्ये 
भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दानवे कायमच आपल्या बोलण्याच्या खास शैलीमुळे चर्चेत असतात. त्यांचा एक मोठा चाहता वर्गही असला तरी अनेक वेळा त्यांची जीभ घसरली आहे. आता दानवेंचं हेच बोलणं पुन्हा एकदा त्यांच्या अंगलट आलं आहे. शेतकऱ्यांना 'साले' असा उल्लेख केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.