पुणे : राज्यामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम (gram panchayat) सुरू आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार गट आणि भाजप जरी एकत्र सत्तेमध्ये असले तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या काटेवाडी गावात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. यंदा राष्ट्रवादीच्या श्री जय भवानीमाता पॅनलच्या विरोधात सरपंचासह सर्व जागांवर भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी बहुजन ग्रामविकास पॅनल तयार केले आहे तर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सरपंचपदी पांडुरंग कचरे यांनी निवडणूक लढवली होती. परंतु राष्ट्रवादीचे विद्याधर काटे यांनी त्यांचा पराभव केला होता. राज्याच्या मंत्रिमंडळात जरी हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होत आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोण किती जागांवर वर्चस्व मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


अजित पवार गट आणि भाजप यांच्यात काटेवाडीत काटे की टक्कर...


अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले असले तरी बारामतीत मात्र भाजप आणि अजित पवार जमत नाही आहे. त्याचं कारण आहे बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या पॅनल पुढे भाजपाचा पॅनल उभा ठाकला आहे. तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावात देखील भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे. बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायत, इंदापूर तालुक्यातील 6, दौंड तालुक्यातील 9 तर पुरंदर तालुक्यातील 12 ग्रामपंचायत साठी उद्या मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही तर गावातील अंतर्गत राजकारणावर आणि नातेसंबंधावर लढवली जाते. मात्र पक्षाच्या चिन्हावर जरी लढवली जात नसली तरीही या निवडणुकीला राजकीय किनार नक्कीच मिळाली आहे. 


बारामती


बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायत निवडणूक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक 5 तारखेला मतदान होणार आहे.  भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी लढाई आहे


इंदापूर


इंदापूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा येथे ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत आहे.


दौंड


दौंड तालुक्यातील केडगाव , कुरकुंभ , पारगाव, मलठण, खोपोडी, वाटलूज, पांढरेवाडी, वाखारी, पानवली, वडगाव बांडे आणि नायगाव या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी पानवली व वाटलूज या दोन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.


पुरंदर


पुरंदर तालुक्यातील 15 पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. 12 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


राज्यात उद्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी मतदान