पुणे: पुण्यातील नाना पेठेत झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरलं. या घटनेनंतर मृत आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी आधीच्या वादाचा आणि आताच्या घटनेवर सविस्तर भाष्य केलं आहे. कल्याणी कोमकर यांनी माध्यमांशी बोलताना बंडू आंदेकर आणि संजीवनी कोमकर यांच्यात वाद काय होता? याची माहिती देखील दिली आहे.

Continues below advertisement

संजिवनीने मागितलेला हिस्सा तेव्हा...

कल्याणी कोमकर यांनी म्हटलं की, माझ्या मुलाच्या हत्या प्रकरणात सर्वांचा समावेश आहे, हे मला माहिती आहे. माझी मोठी बहिण संजिवनी कोमकर, ती पण अण्णांसारखीच(बंडू आंदेकरसारखी) तापट आहे. ती पण तशीच रागीट आहे. संजिवनीने तिचा हिस्सा अण्णांकडे मागितला होता. तेव्हा कृष्णा आंदेकर जेलमध्ये होता. संजिवनीने हिस्सा मागितल्यावर अण्णा म्हणाले कृष्णा आल्यावर बघूया. कृष्णा बाहेर आल्यावर अण्णांनी तिला बोलवलं नाही, ती अण्णांकडे गेली नाही, असा वाद होता. तो त्यांचा विषय होता. त्यानंतर तो विषय वाढतच गेला आणि आता हे माझ्या पोरावर आलंय, त्यामुळे मला बोलावं लागतंय.

सोनाली आंदेकरला अटक करा 

मी सगळ्यांची नावं पोलिसांना दिली. कोणाला सुद्धा माझ्या लहान मुलाची दया आली नाही. लक्ष्मी आंदेकर ती पण आज्जीच आहे ना... पण कुणाला काहीच वाटलं नाही का? वृंदावनी वाडेकरच्याच घरी सगळे असतात. सोनाली वनराज आंदेकरला देखील अटक करा. तिची मुलगी देखील माझ्याऐवढीच आहे. तिला पण माझ्या वेदना कळायला हव्यात. तिला मामी असून देखील तिला कळकळ नाही आली, ऐवढी कठोर माणसं कशी असू शकतात, असं कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

त्या म्हणाल्या, माझ्या मुलावर गोळीबार झाल्याचं ऐकताच मला धक्का बसला. आयुषचे नामकरण माझ्या वडिलांनी म्हणजेच बंडू आंदेकर यांनीच केले होते. लहान असताना त्यांनी आयुषचे खूप लाड केले, पण त्यालाच मारताना त्यांनी काहीच विचार का केला नसेल? त्यांना काळीज नाहीये का? असा सवाल आई कल्याणीने भावनिक होत विचारला आहे. 

आम्ही काहीच केले नाही. वनराज भाऊची हत्या झाल्यावर आम्हीच का दोषी? आमच्या मागे कोणीच नाही, म्हणून आमचा फायदा घेतला जातोय. गणेशने वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून शपथ घेतली होती की, मी मारले नाही. तरीही आम्ही एक वर्ष तुरुंगवास भोगतोय. आता मुलाची हत्या झाली. प्लीज, आम्हाला न्याय द्या! सीपी ऑफिसला गेलो, पण सीपी सर रजेवर असल्याचे सांगितले जाते. कोणी भेटतच नाही. सोनाली आंदेकर, कृष्णा, शिवराज, शिवम, अभिषेक हे सर्व फरार आहेत. ते आरतीच्या वेळी इथे आले होते, मुलांना घेऊन गेले. वनराजच्या हत्या झाली पण पुरावा काय? गुन्हा सिद्ध झाला नाही तरी शिक्षा होतेय. आमच्या घरात कोणी नाही, आम्ही गरीब आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.