Pune Rikshaw news : पुण्यातील रिक्षा चालकांना (Pune) चक्का जाम आंदोलन (rikshaw strike) चांगलच भोवलं होतं. आंदोलनात सहभागी असलेल्या 37 रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. ऑटो रिक्षा बंद दरम्यान रिक्षाचालकावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या रिक्षा पंचायत समितीने निदर्शनं केली आहेत. कष्ट करणाऱ्या लोकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. हे गुन्हे मागे घेतले नाहीतर आम्हाला सत्याग्रह करून आंदोलन करावं लागेल, असा इशारादेखील बाबा आढाव यांनी दिला आहे.
आज (19 डिसेंबर) सकाळी बाबा आढाव यांनी आणि रिक्षा पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन केलं, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेखील दिलं. रिक्षाचालकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे बेकायदेशीर आहेत. हातावर पोट असणाऱ्या सगळ्या रिक्षाचालकांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी बाबा आढाव यांनी केली आहे.
रिक्षा पंचायत समिती सत्याग्रहाच्या मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन करेल
ओला, उबेर आणि रॅपिडो यांच्यामुळे रिक्षाचालकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आता ओला, उबेर आणि रॅपिडोचा वापर करायला लागल्याने रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी ओला, उबेर आणि रॅपिडो बंद करा अशी मागणी मागील काही दिवसांपासून लावून धरली आहे. रिक्षा चालकांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र रॅपिडो अजूनही सुरुच आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी चक्का जाम आंदोलन पुकारलं होतं. याच वेळी त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेतले नाही तर रिक्षा पंचायत समिती सत्याग्रहाच्या मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन करेल, असा इशारा बाबा आढाव यांनी दिला आहे.
रिक्षा चालकांना आंदोलन भोवल...
सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी रिक्षाचालकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. पुण्यातल्या रिक्षाचालकांविरोधात गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांच्यासह 37 जणांना अटक करण्यात आली होती. पुण्यातल्या रिक्षाचालकांना पोलिसांनी आंदोलन करू नका म्हणून कलम 149 नुसार नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही दहा रिक्षा संघटनांनी आधी पुण्यातल्या आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर रिक्षाचालकांनी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. अखेर पोलिसांनीच स्वत: त्या रिक्षा बाजूला करून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले होते.