Pune Crime News: रिक्षा आणि गाडीची धडक बसून जखमी झालेल्या जेष्ठ व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पुणे (Pune) महापालिकेच्या (pmc) गेटवर सोडण्यात आलं होतं. अटक होण्याच्या भीतीने रिक्षाचालकाने व्यक्तीला सोडून पळ काढल्याचा प्रकार घडला होता. या सगळ्यात जखमी व्यक्तीला वेळेवर उपचार न मिळाल्याने जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला होता. विष्णू साहेबराव आढाव असे 52 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव होतं . याप्रकरणी जुनी सांगवी येथील रिक्षाचालक सचिन थिगले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
विष्णू हे माळीचे काम करत होते. 23 जून रोजी दुपारी ते बाणेरहून विद्यापीठ रोडने पुण्याच्या दिशेने जात होते. संशयित आरोपी थिगले याच्या मालकीची रिक्षा भीमाना श्री चौकाच्या पुढे मागून विष्णूवर धडकली. त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघात पाहून नागरिक जमा झाले होते. रिक्षाचालकाने विष्णू यांना रुग्णालयात नेत असल्याचं सांगितलं.
नागरिकांनीही विष्णू यांच्या उपचारासाठी पैसे जमा करून रिक्षाचालक असलेल्या सचिनला दिले. त्याला तातडीने उपचाराची गरज होती. मात्र अटक होण्याच्या भीतीने सचिनने विष्णूला महापालिकेच्या दारात सोडून पळ काढला होता. त्यावेळी विष्णू बेशुद्ध पडले होते. एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती एकाने शिवाजीनगर पोलिसांना दिली होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत विष्णूचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना रिक्षाचालकाने विष्णूला महापालिकेच्या दारात सोडल्याचे शिवाजीनगर पोलिसांना समजले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान 27 दिवसांनंतर आरोपी रिक्षाचालक सचिन थिगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या या कृत्यामुळे महापालिकेच्या परिसरात खळबळ उडाली होती. भीती न बाळगता विष्णू यांच्यावर योग्य वेळी उपचार झाले असते तर जीव वाचला असता, असं अनेकांचं मत होतं. मात्र जखमी व्यक्तीला रिक्षा चालक सोडून फरार झाल्याने त्या व्यक्तीचा जीव गेला.