पुणे : आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केला आहे. अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. देशमुख यांनी भाजपला रामराम केल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला हा फटका मानला जात आहे. अतुल देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. ते सध्या अजित पवारांसोबत असलेल्या खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झाले होते. मात्र, दिलीप मोहिते अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने अतुल देशमुख नाराज झाले होते. 


भाजप सोडताच काय म्हणाले?


अतुल देशमुख राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर म्हणाले की, मागील अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली. समन्वयही साधता आला नाही. मागील एक दीड वर्षात हीन वागणूक मिळाल्याने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. काय करायचं हा निर्णय घ्या असं सांगितलं, स्वाभिमानाने लढायचं, पवारांमागे उभ राहायचं. आज आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करायचं ठरवलं आहे. दरम्यान, अतुल देशमुख उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपचे मोठं नाव आहे. लोकसभेच्या महायुतीच्या जाहीर मेळाव्यात त्यांनी दांडी मारल्याने चर्चा रंगली होती. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत देशमुखांची व्यक्त केली. शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीनंतर भाजपत नाराजी आहे. 


राजीनामा देताना काय म्हटले होते?


शिवाजी आढळराव पाटील व त्यांच्या कार्यकत्यांना निधी दिला. आमदार दिलीप मोहितेंनाही मोठ्या प्रमाणात निधी दिला. परंतु भाजपच्या माध्यमातून निवडून आलेल्या ग्रामपंचायींना व नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांना निधीपासून वंचित ठेवले. कामासाठी वरिष्ठांना भेटल्यानंतर टाळले गेले. यावरुन खेड तालुक्यात वरिष्ठ नेत्यांना फक्त एका जिल्हा परिषद गटातच पक्ष वाढवायचा आहे. माझ्यासारख्या इतर कार्यकत्यांची नेत्यांना पक्षात गरज वाटत नाही. त्यामुळे प्राथमिक सदस्यत्वासह खेड आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख, भाजप पदाचा राजीनामा देत आहे, असल्याचे अतुल देशमुखांनी स्पष्ट केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या