Ashadhi Wari 2025 : ज्ञानोबा माऊली तुकाराम! संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान, इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं वारकऱ्यांचा हिरमोड?
Ashadhi Wari 2025 : आळंदी येथून ज्ञानोबांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

Ashadhi Wari 2025 : आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव मानला जातो. या काळात राज्यभरात भक्ती, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. यंदा, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तुकोबारायांच्या पालखीने 18 जून 2025 रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. तर आळंदी येथून ज्ञानोबांची पालखी आज दि. 19 जून 2025 रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. ही वारी 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे विठुरायाच्या चरणी समाप्त होणार आहे.
आषाढी वारीत यंदाही लाखो वारकरी सहभागी होणार असून, पुणे शहरातून संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या 20 जून ते 23 जून २०२५ या कालावधीत मार्गक्रमण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे.
वारीच्या काळात लाखोंच्या संख्येने वारकरी पुण्यात दाखल होतात. गर्दीचे योग्य व्यवस्थापन, वाहतुकीचा सुरळीत प्रवाह आणि संभाव्य आपत्कालीन घटनांवर तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी 8 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
असा असेल पोलीस बंदोबस्त
अतिरिक्त आयुक्त- 4
पोलीस उपायुक्त - 10
सहाय्यक आयुक्त- 20
पोलीस निरीक्षक- 128
सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक- 513
पोलीस अंमलदार- 6143
एसआरपीएफ- एक कंपनी
होमगार्ड- 1240
क्यूआरटी- 12
बीडीडीएस- 6 पथके.
तुकोबांची पालखी आज आकुर्डीत मुक्कामी
दरम्यान, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर ही काही प्रमाणात पाणी साचत आहे. मात्र ऊन, वारा अन पाऊस काहीही असो वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते, त्यामुळं तो सर्व काही विसरुन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतो. तुकोबांच्या पालखी प्रस्थानानंतर आज पालखी देहूतून पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीत मुक्कामी येणार आहे. पण या मार्गावर आता परिस्थिती आवाक्यात असली तरी पावसाचा जोर वाढला तर रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, असं असलं तरी वारकरी पावसात ही आजचा टप्पा पूर्ण करणार आहेत.
इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं वारकऱ्यांचा हिरमोड
इंद्रायणी काठी आळंदी वसलीये अन् तिचं इंद्रायणी नदी दुथडी वाहत आहे. अशातच आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ही आहे. लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होतायेत. मात्र इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं वारकऱ्यांचा हिरमोड होणार आहे. कारण माऊलींच्या चरणी माथा टेकवण्यापूर्वी वारकरी या पवित्र इंद्रायणीत स्नान करतो. अशी प्रथा आहे. मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या प्रथेत खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा


















