Anantrao Thopte Passes Away : राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं निधन (Anantrao Thopte Passes Away) झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनंतराव थोपटे अनेक वर्षे राज्य मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री होते
अनंतराव थोपटे हे पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. तसेच भोर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले होते. अनंतराव थोपटे अनेक वर्षे राज्य मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री होते. तसेच ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर थोपटे काँग्रेसचे विधीमंडळातील गटनेते होते. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते. माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे यांचे ते वडिल होते.
मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजकारणात थोपटे घराण्याचे नाव मोठे आहे. अनंतराव थोपटे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्त्व होते. त्यांनी एकूण 14 वर्षं मंत्रिपद भूषवलेलं होते. ते एकूण 6 वेळा भोर मतदारसंघाचे आमदार राहिले. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. काँग्रेस पक्षातही त्यांच्या शब्दाला मोठा मान होता. अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे सध्या राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. संग्राम थोपटे यांचा 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शंकर मांडेकर यांनी पराभूत केले होते. त्यांनतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अनंतराव थोपटे यांनी पुण्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी त्या काळात खूप प्रयत्न केले. काँग्रेस पक्षवाढीत त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. म्हणूनच त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनंतराव थोपटे यांना 1983 साली पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्या काळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी अनंतराव थोपटे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना राज्यमंत्रिपद दिलं. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाली होती.
थोपटे साहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका जुन्या जाणत्या लोकनेत्यास मुकला : खासदार सुप्रिया सुळे
राज्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे साहेब यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना अतिशय मोलाचे कार्य केले. त्यांच्याच काळात दुग्धव्यवसायाशी संबंधित अनेक महत्वाचे उपक्रम सुरु करण्यात आले होते. त्यांनी काही काळ शासकीय सेवेत अधिकारी म्हणूनही काम केले होते. त्यांनी अनेक वर्षे भोर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना तेथील जनतेशी अतिशय जवळचे नाते निर्माण केले होते. बारामती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना त्यांच्या मार्गदर्शनाचा सदैव लाभ झाला. थोपटे साहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका जुन्या जाणत्या लोकनेत्यास मुकला. त्यांच्या निधनामुळे त्यांचे पुत्र संग्राम आणि परिवारावर कोसळलेल्या अपार दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.