Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
Yugendra Pawar On Ajit Pawar : आमच्या विरोधात मोठी शक्ती उभी आहे, त्यांच्याकडे मोठे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, पैसा आहे, तर आमच्याकडे सर्वसामान्य घरातील उच्च शिक्षित उमेदवार आहेत असं युगेंद्र पवार म्हणाले.

पुणे : बारामती नगरपालिका निवडणुकीत आमच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यात येत आहे, चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी केला. जे लोकसभेला झालं, विधानसभेला झालं तेच आता नगरपालिका निवडणुकीतही होत आहे असंही युगेंद्र पवार म्हणाले. तसेच आमच्याविरोधात मोठी शक्ती आहे असं म्हणत युगेंद्र पवारांनी अजित पवारांकडे बोट दाखवलं.
बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ युगेंद्र पवारांच्या हस्ते झाला. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी चार ठिकाणी आपल्या उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याचं युगेंद्र पवार म्हणाले.
Yugendra Pawar On Baramati Election : आमचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील
युगेंद्र पवार म्हणाले की, "अजित पवार गटाचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्या आठ पैकी साधारण चार जागांवर आमचे उमेदवार होते आणि त्या चार जणांना विरोधी गटाने प्रत्येकी 20 लाख रुपये दिल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातील आहेत, कष्ट करणारे आहेत. पुढचे दहा वर्षे जरी त्यांनी कष्ट केलं तरी त्यांना वीस लाख रुपये कमवता येणार नाहीत. त्यापैकी दोन उमेदवार नवीनच आपल्याकडे आलेले होते, ते कुठल्याही पक्षामध्ये नव्हते. जर आम्हाला संधी दिली तर आम्ही चांगलं काम करून दाखवू असं ते म्हणाले होते. आम्हीही त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण ते फुटले. बरेच लोक हे मुद्दाम करण्यासाठी येतात."
Yugendra Pawar On Ajit Pawar : आमच्या उमेदवारांवर दबाव
युगेंद्र पवार पुढे म्हणाले की, "आमचे उमेदवार हे सर्व छोटे व्यवसायिक आहेत. उच्च शिक्षित आणि उच्च प्रतिमा असलेले तरुण उमेदवार आपण दिलेले आहेत. त्यांच्यावरही दबाव आणला जात आहे. आमच्या समोर खूप मोठी शक्ती आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, संस्था आहेत. हे सगळे तिथे काम करत असतात, त्यांच्यावर दबाव आणला जात असेल तर मग दोन-तीन लोक जाणार हे साहजिक आहे. लोकसभेला आणि विधानसभेला ही दहशत आपल्याला पाहायला मिळाली होती. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील तेच पाहायला मिळत आहे."
या वेळेला तुम्ही सामान्य घरातील लोकांना एखदा संधी देऊन बघा. जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल, चांगला मजबूत विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन युगेंद्र पवार यांनी केलं.
ही बातमी वाचा:
























