पुणे : भारतीय हवामान विभागाकडून (IMD)

   पुण्यात 24 मे पर्यंत हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज (Pune Weather Report) वर्तवला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेलस इसा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे.  पुण्यातील इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये पावसानं काल हजेरी लावली होती. 


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे शहरात दिवसाचं  तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. हे तापमान पुढील काही दिवस कायम असेल. पुणे शहरात शिवाजीनगर आणि लोहेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावलेली होती. रविवारी मात्र पावसानं हजेरी लावली नव्हती. 


हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या  अभिसरणाची स्थिती निर्माण झाली आहे. दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल, असं देखील सांगण्यात आलं आहे. या स्थितीमुळं वातावरणातील आर्द्रता वाढू  शकते. वातावरणातील या बदलांमुळं शहरातील काही भागात सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे, असं सांगण्यात आलं आहे. 




पुण्यामध्ये अशा प्रकारच्या वातावरणाची स्थिती पुढील काही दिवस असेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये या काळात 40 ते 50 कि.मी. प्रति तास या वेगानं वारे वाहू शकतात, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. 


दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावतीनं नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन दक्षिण निकोबार बेटावर आणि दक्षिण अंदमान सागरात झाल्याच सांगितलं. याशिवाय मान्सून मालदीव, कोमोरिन भाग, आणि बंगालच्या खाडीच्या दक्षिणेकडील भागात झाल्याचं सांगितलं. 
 
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून केरळमध्ये 31 मे पर्यंत पोहोचेल. भारतीय हवामान विभागानं यंदा सामान्य म्हणजेच सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. 


भारतात गेल्यावर्षी मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. 8 जूनला मान्सून केरळमध्ये पोहोचला होता.  


दरम्यान, इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी वादळाचा तडाखा बसला आहे. इंदापूर तालुक्यातील कचरवाडी भागात अवकाळी वादळांने घराचे जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाले. लिंबाची मोठी झाडे देखील कोसळली. काही ठिकाणी विजेचे खांब देखील वाकले झाले असून विड्याच्या पानांच्या शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.  


मागील दोन ते तीन दिवस राज्यभरातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. कोकणातील देखील अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि पाऊस पडण्याचे प्रकार सुरू आहेत.यात आता चिपळूण मधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे, अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या.


 संबंधित बातम्या : 



Maharashtra Wheather Report : पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे तांडव, झाडं-विद्युत खांब कोसळले, गोठ्यांचे पत्रे उडाले