पिंपरी चिंचवड : दिवंगत अजित पवारांची आज पहिलीचं शासकीय जयंती (Ajit Pawar Birth Anniversary) पार पडत आहे. याचं जयंतीचे सोपस्कार पार पाडताना पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी (NCP Ajit Pawar) आणि भाजपमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. बराच वेळ वाट पाहून ही महापौर रवी लांडगे शासकीय जयंतीला गैरहजर राहिले, त्यामुळं वादाला तोंड फुटलं. महापौरांच्या हजेरीत शासकीय जयंती आणि पुण्यतिथीचे सोपस्कार पार पाडण्याची परंपरा आहे. त्यामुळं महायुतीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांच्या पहिल्या शासकीय जयंतीचे  (Ajit Pawar Birth Anniversary) सोपस्कार पार पाडण्यासाठी महापौर हजर राहतीलचं, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना होती. 

Continues below advertisement

Ajit Pawar Birth Anniversary: नेमकं काय घडलं?

मात्र अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका दौऱ्यानिमित्त शहरातून जाणार होते, मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस असल्यानं महापौरांना त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांना यायला वेळ लागला अन दुसरीकडे महापालिकेत अजित पवारांच्या शासकीय जयंतीचे सोपस्कार पार पाडण्यात विलंब होऊ लागला. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर वैशाली घोडेकरांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. भाजपसाठी आजचा भावनिक दिवस नसला तरी तो आमच्यासाठी भावनिक दिवस आहे. असं म्हणत घोडेकरांनी भाजपचे आमदार अमित गोरखे आणि सभागृह नेते प्रशांत शितोळेना खडेबोल सुनावले. 

दुर्दैव्य म्हणजे सहा महिन्यांपूर्वी पर्यंत प्रशांत शितोळे हे अजित पवारांना राजकीय गुरु मानत होते. त्याचं आपल्या गुरुंची आज पहिली जयंती आहे. जे गुरु वेळेला किंमत द्यायचे पण त्याच गुरुंच्या शासकीय जयंतीला प्रशांत शितोळे वेळेत येऊ शकले नाहीत. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. हे पाहूनचं राष्ट्रवादीच्या घोडेकरांना संताप अनावर झाला. महापौरांना अन भाजपला इतर कामं होती तर शासकीय जयंतीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी, अजित दादांच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी सकाळी 9 वाजता वेळ का ठेवली नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला. बारा वाजायला आले तरी महापौर आलेचं नाहीत त्यामुळं जे उपस्थित होते, त्यांनी अजित दादांच्या फोटोला अभिवादन केलं आणि शासकीय जयंतीचे सोपस्कार पार पाडले.

Continues below advertisement

Rajendra Pawar Social Media Post: राजेंद्र पवार अजित दादांसाठी भावनिक पोस्ट 

"२२ जुलै,आज तू ६७ वर्षे पूर्ण,म्हणजे माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान. डोळ्यापुढून सारा काळ सरकतो.आपण ४-५ वर्षाचे असताना तू रात्री बारामतीत कंदील घेऊन पळून जाऊन अंधाराची भीती दाखवे,उन्हाळ्यात फाट्यात पोहून फुफाट्यात आपण रस्त्यावर लोळलो.त्यावेळी पाटकऱ्याला आपण घाबरलो पण मोठेपणी त्याच खात्याचा तू मंत्री झालास.शाळेचे सर्टिफिकेट आणताना घाबरून घरी न जाता मुंबईला शाळा उघडेपर्यंत चौपटीवरच बसलो.जाणाऱ्या लाल दिव्याच्या गाड्या पाहून आपण असे कधी होणार म्हणता-म्हणता तू मंत्री झालास.आपण दोघांनीच तात्यासाहेबांचे पंचगंगेच्या घाटावर केलेले अस्थीविसर्जनही आठवते.बेंगलोरवरून ट्रकने गाई आणल्या,प्रवासात तू मी एकत्र होतो. पंचमीला काच लावून मांजा केला पण पतंग व काटाकाटी तूच करायचा,लहानपण भराभर सरले."

"तू मोठा झाला,मंत्री झाला पण मनात प्रेमाचा हळवा कोपरा कायम जपलास. रोहीत दोन महिन्याचा होता,आपण एवढा लहान घेऊन तुझ्या हनिमूनला पूर्ण गाडी चालवत उटीला गेलेलो.त्याच रोहितला पहिल्या इलेक्शनला तू सांभाळलेस.जरी पक्ष म्हणून आपण वेगळे झालो तरी शेवट-शेवट त्याच्याशीच एकत्र येण्याविषयी,एकत्र काम करण्याबद्दल जवळकीने बोललास.कृषिकच्या उद्घाटनाला येऊन आठवणीने तुझ्या वहिनीच्या हातची आवडती भाजी व कवठ खाऊन नेहमीप्रमाणे मनापासून जेवणाला दाद देऊन गेलास,आवडले ते मनापासून बोलणारा तू. तू आज नाहीस,१९६४ च्या दरम्यान आपले चुलते वसंतदादांच्या अपघाती निधनाने पवार घराणे स्तब्ध झाले होते,तसेच आज तुझ्या जाण्याने झालेय.तुझ्या असण्याचा व नसण्याचा फरक सर्वांनाच प्रकर्षाने जाणवतोय.तू नाहीस हे जरी सत्य असले तरी तू येशील हा भास मात्र होत राहतो.मनापासून तुझी आठवण येतेय.तुझे अस्तित्व जाणवत राहते, “काय बंधू” म्हणून तुझ्या हाकेच्या सादेची मन कायम वाट पाहते..राजेंद्र पवार", अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

NCP Sunetra Pawar Post : सुनेत्रा पवार यांची अजित दादांसाठी भावनिक पोस्ट 

दादा...एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला...घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात.तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ...आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही.काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील...माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...!