Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेला बारामती मतदारसंघात जे घडलं त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या चर्चा सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच (Baramati Assembly) लढणार असल्याचे बोलले जात होते. याबाबत एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी खात्रीशीर माहिती दिली होती, त्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी याबाबतची घोषणा केली आहे.


अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार


सध्या अजित पवार विविध मतदारसंघात लढण्यासंदर्भात आढावा घेत असल्याची चर्चा तथ्यहीन असल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अजित पवार आपल्या पारंपारिक मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभेतूनच लढणार यावर आता जवळ जवळ शिक्कामोर्तब झाले आहे. अजित पवार बारामतीतून लढणार की शिरूरमधून अशा चर्चा देखील सुरू होत्या.


अजित पवार बारामती विधानसभेतूनच लढणार!


लोकसभेप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये पवार विरूध्द पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. राज्यभरात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार फटका दिला आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या त्यांच्याकडे येणाऱ्यांची नेत्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसते आहे. त्यातून शरद पवारांना भेटणासाठी येणाऱ्यांचीही रांग आता वाढत चालल्याचं दिसतं आहे. अशातच लोकसभेचा धसका घेत अजित पवार हे काहीशी सावध भूमिका तर घेत नाहीये ना? त्यातूनच अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढत नाहीये ना? असे अनेक प्रश्न या निमित्याने राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात होते. त्या चर्चांवर आज प्रफुल पटेलांनी पडदा टाकला आहे. 


बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांनी उभे राहावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उभे राहावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती शहरातील सातव चौकात कार्यकर्ते ताफा आडवणार आहेत, यावेळी ते अजित पवारांना  निवडणुकीला उभं राहावं यासाठी साद घालणार आहेत. जोपर्यंत अजित पवार स्वतःची उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवून धरणार असल्याची माहिती आहे.