पुणे : उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे मेट्रोची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी बारकाईने मेट्रोची पाहणी केली. पुण्याच्या मेट्रोचं काम संथ गतीने सुरु असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी पाहणी करुन मेट्रो प्रशासनावर सुचनांचा भडिमार केला आहे. शिवाजी नगर मेट्रो स्टेशनवर त्यांनी पाहणी केली आहे. पाहणी दरम्यान या मेट्रो स्टेशनवर एकट टाईल्स काळी दिसल्याने अजित पवारांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यासोबतच त्यांनी पुणे शहरातील विविध विभागांचा आढावा घेतला आहे. प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी 50 वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश त्यांनी दिले आहे. 


प्रत्येक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर काळानुरुप गरजेनुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणेपिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विस्तारित इमारत आदी शासकीय इमारतीचे काम नव्याने पूर्ण करण्यात आले आहेत. नोंदणी भवन, शिक्षण भवन, कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन आदी इमारतींचे काम सुरु आहेत तर काही इमारतींच्या कामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यताही देण्यात आल्या आहेत. 


आगामी काळातही विविध शासकीय इमारती नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीचे आराखडे तयार करताना संबंधित विभाग प्रमुखाला विश्वासात घेऊनच आराखडे तयार करावेत. आराखड्यात प्रामुख्याने वीज, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करा. यासाठी नामांकित, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करावी.इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे, असंही त्यांनी खडसावून सांगितलं.


सारथी येथील बैठक सभागृहात ध्वनी प्रणाली व प्रकाश व्यवस्था अत्याधुनिक बसवावी. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. नूतन कार्यालयाच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या मजबूत आणि पुरेशा उंच बनवाव्या. सहकार आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचा आराखडा पारंपरिक न राहता त्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे. वाहनतळ जागेचा विचार करता ते दुमजली करा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या.


प्रस्तावित कामगार भवन परिसरातील येथील नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, कामगार भवन बांधकामाच्यावेळी विरोध करु नये. या कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील अजित  पवार यांनी दिली.


इतर महत्वाची बातमी-
'मी लेचापेचा नाही, 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी, राजकीय आजार स्वभावात नाही', अजित पवारांकडून विरोधकांचा समाचार