पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या घरी अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 


काय म्हणाले अजित पवार? 


अजित पवार म्हणाले की,माझी देखील अनेक आमदार भेट घेतात. बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली तर याबाबत त्यांनाच विचारा. निवडणुका आल्यावर काहींना निवडणूक लढायची असते. मात्र ही जागा आपल्या पक्षाला सुटणार नाही हे लक्षात आल्यावर आपण इथं थांबण्यापेक्षा दुसऱ्या पक्षात जाऊ, असे अनेकांना वाटतं. त्यामुळे लोक एकमेकांच्या भेटी घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. 


शरद पवारांचे वक्तव्य चर्चेत 


दरम्यान, शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सूचक वक्तव्य केले आहे. अतुल बेनके यांच्या भेटीबाबत शरद पवारांनी म्हटले की, यामध्ये नवीन काय आहे? आमच्यात काही चर्चा झाले नाही. लोक भेटायला येतात. अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केले ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात : अतुल बेनके 


शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते, असे म्हणत शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी तुतारी वाजविण्याचे संकेत दिले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी : शरद पवार-अजितदादा आज पुण्यात आमनेसामने, राजकीय घडामोडींना वेग


Atul Benke: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, अमोल कोल्हेंच्या घरी अतुल बेनके-शरद पवारांची भेट, अजितदादा गटाला धक्का बसणार?