Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) बारामती विमानतळावर विमान लँडिंग करताना झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. वयाच्या 66व्या वर्षी अजितदादांच्या अकाली एक्झिटने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अखेरच्या श्वासापर्यंत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत राहिले. या अपघातात अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक, दोन वैमानिक आणि एका महिला क्रू मेंबरसह पाच जणांचा मृत्यू झाला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. विमान लँडिंगसाठी बारामती विमानतळाजवळ येत होते. सुरुवातीला पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती, म्हणून त्याने विमान जास्त उंचीवर उचलले.

विमान धावपट्टीवरून घसरले आणि कोसळले

पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, विमान धावपट्टीवरून घसरले आणि कोसळले. त्यानंतर लगेचच मोठा स्फोट झाला. लँडिंग दरम्यान पायलटने कोणतेही आपत्कालीन सिग्नल दिले नाहीत असेही वृत्त आहे. त्यांनी "मेडे" कॉल देखील केला नाही. घटनेवेळी बारामती फ्लाइंग क्लबमध्ये कोणतेही विमान उड्डाणात नव्हते. दरम्यान, अजित पवारांचा अपघात झाला तेव्हा काका शरद पवार मुंबईत होते आणि सुप्रिया सुळे दिल्लीत होत्या. माहिती मिळताच ते त्यांच्या कुटुंबासह बारामतीला रवाना झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे आणि राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला आहे.

हातातील घड्याळावरून ओळख पटली

दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे. त्यांच्या हातातील घड्याळावरून अजित पवार यांच्या देहाची ओळख पटली. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे चिन्ह आणि बारामती ते समीकरण कायम राहिल्याचं दिसून आलं. ज्या बारामतीमध्ये त्यांनी हयात घालवली, संघर्ष केला, इतकेच नव्हे तर आपल्या काकांसोबत त्यांनी दोन हात केले त्याच बारामतीच्या मातीमध्ये धुरंदर नेता अपघाताने कायमचा विसावला हे शल्य कायमच बारामतीकरांच्या मनामध्ये राहील यामध्ये शंका नाही. 

शेवटच्या श्वासापर्यंत राज्याच्या विकासासाठी कार्यमग्न

दरम्यान, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत राज्याच्या विकासासाठी कार्यमग्न राहिल्याचं दिसून येत आहे. अपघातग्रस्त विमानामध्ये त्यांच्या फाईल्स आणि त्यांचे सीट विखुरलेली दिसत आहे. व्हायल  फोटो सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेचं किती मोठं उदाहरण होतं हे दाखवून देत आहे. अजित पवार आणि बारामती कायमचं समीकरण राहिले. 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार नेतृत्व करत आहेत. त्यामुळे अजित पवार हे बारामतीला रागावताना, तसेच प्रेमाने सुद्धा बोलताना कधीच कचवरले नाहीत. त्यांचा कायम करारी बाणा या बारामतीकरांनी पाहिला. मात्र त्याच बारामतीच्या मातीमध्ये अशा अपघाती निधनाने त्यांची अकाली एक्झिट होईल याची पुसटशी सुद्धा कल्पना कोणाच्याही मनात नव्हती. मात्र, नियतीच्या मनामध्ये काही वेगळंच असतं ते पुन्हा एकदा दिसून आलं. 

इतर महत्वाच्या बातम्या