पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यनंतर (Ajit Pawar Plane Crash) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आता आणखी एक दावा केला आहे. अजित पवारांच्या मृत्यूदिवशी संध्याकाळी पाच वाजता घटनास्थळी गेलो असता तेथील सरपंचाने धक्कादायक माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना स्फोट झाला अशी माहिती सरपंचांनी दिली असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला. 

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती  समोर आल. मात्र विमानात सहा जण असताना पाच मृतदेह कसे मिळाले? सहावा व्यक्ती कुठे गेला? असा प्रश्न अमोल मिटकरींनी विचारला. 

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघातावर सरपंचांचा दावा

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, "घटनेच्या दिवशी अंत्यविधी आटोपल्यानंतर आपण घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणचे सरपंचांनी आम्हाला सांगितलं की, कुणीतरी त्या विमानातून उडी मारण्याची धडपड करत होते. आम्ही त्याला वाचवण्यासाठी गेलो असता त्याचा मोठा स्फोट झाला. त्यानंतर त्या ठिकाणी पाच मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. डीजीसीए म्हणतंय सहा जणांचा मृत्यू झाला, मात्र त्या ठिकाणी पाच मृतदेह सापडले. याची चौकशी झाली पाहिजे." 

शरद पवारांची भेट घेऊन सरपंचांनी माहिती दिली

दरम्यान, गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला. अपघातावेळी विमानाचा दरवाजा उघडा असल्याची त्यांनी माहिती दिली. निळी पँट घातलेला व्यक्ती बाहेर येतोय असं आधी वाटलं, पण नंतर तसं काही दिसलं नाही. तसेच हे विमान अजितदादांचे होते याची आम्हाला माहिती नव्हती, ते एखाद्या उद्योगपतीचे असेल असं वाटलं होतं. 

सरपंच कल्याण आटोळे यांनी या प्रकरणी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना सगळी माहिती दिली. विमानाने आधी दोन वेळेस घिरट्या घातल्या आणि नंतर खाली येत असताना हा अपघात झाला असा दावा त्यांनी केला. 

दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका व्यक्त केली असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची केंद्रीय स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा: