पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणेने टोकाचं पाऊल उचललं. जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती, सासू व नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र सासरा आणि दीर फरार होते. त्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर फरार सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईआधी राजकीय दबाव होता अशा चर्चा होत्या, त्याचबरोबर या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांवर देखील टीका झाली होती, त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका काल(गुरूवारी) स्पष्ट केली होती. त्यानंतर आता आज पुन्हा एकदा अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, हगवणे प्रकरणात मी कालच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मला या प्रकरणात टार्गेट केलं जात आहे. माझ्या नावाची बदनामी करतात. या प्रकरणाशी माझा दुरान्वे संबंध नाही. यामध्ये मी काल जाहीरपणे बोललो. मी या प्रकरणात पुण्याची सीपींशी आणि पिंपरीच्या सीपींशी बोललो होतो. पण पुण्याचे सीपी म्हणाले, ही केस पिंपरीची आहे, मी त्यांना म्हटलं इकडं तिकडं करू नका. जिथे कोणाची गरज लागेल तिथे त्यांनी सगळी मदत करा. यातील दोघे अटक नव्हते. त्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकं केली होती. मी त्यांना सांगितलं अजून पथकं वाढवा. पण ते सुटता कामा नयेत. आपण जे काही नवे जुने कलमं लावा, या प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या मुलीसोबत ही घटना घडली तिच्या वडिलांशी बोललो. मी कोल्हापूरवरून पुन्हा पुण्यात जाईन तेव्हा मी तिच्या परिवाराला भेटायला जाणार आहे.  मी माझ्या इतरही सहकाऱ्यांना पाठवलेलं होतं अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. मात्र, आता तो विषय काढून उपयोग नाही. जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं. दादा मला असा त्रास होतो. तर ताबडतोब आपण पुढची कारवाई केली असती. तिच्या घरातील व्यक्तींनी आणि नातेवाईकांनी जी इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं, मी पालकमंत्री या नात्याने लक्ष घातलं आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे, अशी काळजी पोलिस खातं आणि आम्ही घेत आहोत, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. 

अजित पवार संतापले?

काल मी कस्पटेंशी बोललो. त्यांना फोन केला होता.माझी चर्चा झालीय त्यानंतर त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. आरोपींनी अटक झाली आहे. आपलं पोलिस खातं सक्षम आहे, कोणी पाताळात लपलेला असेल तरी त्याला आपण शोधून काढू, त्याला पकडून काढू शकतो, माझा त्याच्यांशी काहीच संबंध नाही. माझे विचार अशा गोष्टीत किती स्पष्ट आहेत ते सर्वांना माहिती आहे. तरी माझं नाव घेण्यात आलं असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. मी लग्नाला गेलो त्यात माझा दोष आहे का? मी लग्नाला गेलो म्हणून माझं नाव घेतलं गेलं, त्यात माझा काय दोष आहे, असं म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.